कोरोनानंतरचा काळ बॉलिवूडसाठी अत्यंत कठिण ठरला. मागील दोन वर्षांत अनेक बॉलिवूड चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरविली आहे. यामुळे अनेक सुपरस्टार्सच्या चित्रपटांनाही फटका बसला आहे. आयुष्मान खुराना, अक्षय कुमार, आमिर खान यांचे बिग बजेट चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. आता याप्रकरणी एका आघाडीच्या अभिनेत्रीने भाष्य करत प्रेक्षकांची बाजू घेतली आहे.
अभिनेत्री नुसरत भरुचा ही अत्यंत लोकप्रिय आहे. चित्रपटसृष्टीची कुठलीच पार्श्वभूमी नसताना तिने या क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. आतापर्यंत तिने केलेल्या सर्व भूमिकांचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. वाईट कथा असलेल्या चित्रपटांकडे प्रेक्षकांन पाठ फिरविली पाहिजे असे तिने म्हटले आहे.

कोरोना काळानंतर प्रेक्षकांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत. या काळामध्ये प्रेक्षकांनी जगभरातील कलाकृती ओटीटीवर पाहिल्या, त्यामुळे कुठल्याही कलाकृतीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन बदलला. आता ते कलाकारांपेक्षा कथेला अधिक महत्त्व देत आहेत. प्रेक्षक आता जाणकार झाले आहेत. पूर्वी प्रेक्षक 5 हिरोंच्या मागे धावायचे. आता शेकडो हिरो असल्याने त्या 5 हिरोंचे महत्त्व कमी झाले आहे आणि हीच सध्याची परिस्थिती आहे. आता प्रेक्षकांना कलाकृतींमध्ये बरेच वैविध्य मिळते असे नुसरत म्हणाली.
मागील काही महिन्यांमध्ये प्रेक्षकांनी अनेक मोठ्या चित्रपटांकडे पाठ फिरविली. पण त्यांच्या या भूमिकेने मी आनंदी झाले आहे. चे चित्रपट चांगले नाहीत, त्यांच्याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरविली पाहिजे असे माझे म्हणणे आहे. तर जे चित्रपट चांगले आहेत, त्यांना प्रेक्षकांचा पाठिंबा मिळावा असे नुसरत म्हणाली.









