घाणीचे साम्राज्य : नागरिक-कर्मचाऱ्यांची गैरसोय, स्वच्छता करण्याची मागणी
बेळगाव : महानगरपालिकेतील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाची गैरसोय होऊ लागली आहे. विशेषत: कर्मचाऱ्यांबरोबर नागरिक आणि महिलांची हेळसांड होऊ लागली आहे. त्यामुळे शौचालयाची दुरुस्ती करून स्वच्छता ठेवावी, अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे. महानगरपालिकेत विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांचा ओघ अधिक आहे. त्यामुळे इमारत सतत गजबजलेली असते. मात्र या ठिकाणी असलेल्या शौचालयाचे दरवाजे मोडले आहेत. तर शौचालयात कचरा साचून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दुर्गंधीदेखील पसरू लागली आहे. विविध बैठकीसाठी नगरसेवक आणि इतर नागरिक येत असतात. मात्र त्यांना सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. सभागृह अस्तित्वात आल्यापासून नागरिकांची वर्दळ वाढली आहे. शासकीय कागदपत्रे आणि इतर कामकाजांसाठी नागरिकांचा ओघ वाढू लागला आहे. दरम्यान, निवडणुकीनंतर मनपाचे कामकाज पूर्ववत झाले आहे. त्यामुळे ये-जा वाढली आहे. मात्र येथे येणाऱ्या नागरिकांना प्राथमिक सुविधांपासून दूर राहावे लागत आहे. मनपा शौचालयामध्ये पाण्याचा अभावदेखील दिसून येत आहे. त्यामुळे वापर करणे जिकीरीचे बनू लागले आहे. मनपा प्रशासनामार्फत विविध ठिकाणी विकासकामे राबविली जातात. शहरात सार्वजनिक शौचालये उभी केली जातात. मात्र मनपा कार्यालयातील शौचालयाची मात्र दुर्दशा झाली आहे. त्यामुळे दिव्याखाली अंधार अशी परिस्थिती पहायला मिळत आहे. येथील शौचालयाची स्वच्छता करून सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी होऊ लागली आहे.









