अयोध्यानगर ते एपीएमसी रस्ता ठिकठिकाणी उखडला
बेळगाव : तीन महिन्यापूर्वीच शहरातील डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांची पहिल्याच पावसात दुरवस्था झाली आहे. दर्जाहीन डांबरीकरण करण्यात आल्यामुळे रस्ता उखडून खड्डे निर्माण झाले आहेत. यावरून कामाचा दर्जा दिसून येतो. विकासकामांसाठी कोट्यावधींचा निधी खर्च करूनही दर्जाहीन कामे राबविली जात असल्याने वाहनधारकांतून मनपाच्या कामांबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.अयोध्यानगर ते सदाशिवनगर, आझमनगर ते संगमेश्वरनगरपर्यंतच्या रस्त्याचे दुतर्फा डांबरीकरण करण्यात आले आहे. गेल्या एप्रिल-मे दरम्यान सदर डांबरीकरण करण्यात आले असून पावसामुळे ठिकठिकाणी रस्ता उखडला गेला आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने जोरदार झोडपले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे तर रस्त्यावरील पाण्याचा निचरा होण्यास योग्य नियोजन करण्यात आले नसल्याने रस्ता उखडला आहे.
नुकत्याच करण्यात आलेल्या रस्त्याची पहिल्याच पावसात धूळदान झाल्याने वाहनधारकांतून मनपाच्या विकासकामांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून विकासकामे राबविली जात असली तरी दर्जा ठेवला जात नसल्याने जनतेचा निधी वाया गेल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली जात आहे. रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊनही योग्य नियोजन, दर्जेदार कामे केली जात नसल्याने शहरवासियांना खड्डेमय रस्त्यातूनच प्रवास करावा लागत आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या सदर रस्त्याचे डांबरीकरण उखडून वापरण्यात आलेले चिपिंग रस्त्यावर विखुरले आहे. त्यामुळे रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहेत. संबंधित रस्त्याचे डांबरीकरणाचे काम केलेल्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी शहरवासियांतून केली जात आहे. लोकप्रतिनिधी याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करणार का? हे पहावे लागणार आहे.









