लोकप्रतिनिधींचे रस्ता दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष : दखल घेण्याची नागरिकांची मागणी
बेळगाव : नेहरुनगर येथील बसवाण्णा मंदिर शेजारील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरात आहोत की दुर्गम भागात आहोत, अशी प्रतिक्रिया रहिवाशांतून व्यक्त केली जात आहे. शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्यात आला असला तरी शहरातील अंतर्गत रस्त्यांची पार दुरवस्था झाली आहे. नेहरूनगर येथील बसवाण्णा मंदिर ते मुजावर आर्केडच्या रस्त्यावर निर्माण झालेले ख•s रहिवाशांसह वाहनधारकांना ख•dयांचा सामना करताना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
खड्डा चुकविताना वाहन चालकांची कसरत
दुर्गामाता दौडीच्या दरम्यान रस्त्यावरील खड्डा मुजविण्यासाठी बारीक खडीचा भुसा टाकण्यात आला आहे. यामुळे आणखी अधिक त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे. या रस्त्यांवरून वाहनांच्या सततच्या रहदारीमुळे नागरिकांच्या घरांमध्ये धूळ जात आहे. यामुळे आजारापेक्षा उपाय भयंकर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी निर्माण झालेले खड्डा चुकविताना वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर रुग्णालय व मोठमोठे व्यापारी मॉल असल्याने वाहनधारकांची या रस्त्यावरून नेहमीच वर्दळ असते. रस्ता कायम गजबजलेला असतो. असे असतानाही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे मात्र साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. रहिवाशांकडून लोकप्रतिनिधींकडे अनेकवेळा रस्ता दुरुस्तीसाठी मागणी करण्यात आली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. याची तातडीने दखल घेऊन रस्त्या दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांतून केली जात आहे.









