जलवाहिनी घातल्यानंतर दुरुस्तीकडे दुर्लक्ष
बेळगाव : एलअँडटी कंपनीकडून 24 तास पाण्यासाठी घालण्यात आलेल्या जलवाहिनीनंतर रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. गोवावेस बसवेश्वर सर्कल येथे मागील तीन महिन्यांपासून खोदलेल्या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने वाहतुकीला ये-जा करणे अडचणीचे ठरू लागले आहे. एलअँडटीकडून शहराला 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिन्या घातल्या जात आहेत. मात्र जलवाहिनी घातल्यानंतर चरी बुजवून रस्ता सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहनधारकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: पादचारी आणि वयोवृद्ध नागरिकांना ये-जा करणे अडचणीचे ठरत आहे. शिवाय रात्रीच्या अंधारात अपघात घडू लागले आहेत. त्यामुळे जलवाहिनी घातलेले रस्ते दुरुस्त करून दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.









