त्वरित दुरुस्त न केल्यास वृक्षारोपण करण्याचा इशारा
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक ते शाहुनगरपर्यंतच्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाल्यामुळे जिकडे तिकडे खड्डेच खड्डे अशी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. सदर खड्ड्यातून रस्ता शोधत वाहनधारकांना वाहने चालविताना मुष्कील होत आहे. रस्ता डांबरीकरणासाठी शासनाकडे अनेकवेळा अर्जविनंत्या करूनसुद्धा रस्त्यांची परिस्थिती जैसे थेच आहे. येत्या आठवडाभरात दुरुस्ती न केल्यास वृक्षारोपण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर या प्रथम आमदार बनल्या त्यावेळेस या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. पुन्हा दुसऱ्यांदा याच मतदार संघातून त्या निवडून आल्या. परंतु विकासाचे गाजर दाखविणाऱ्या लोकप्रतिनिधींना सदर रस्त्याच्या डांबरीकरण संदर्भात अनेकवेळा भेटूनसुद्धा रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही. रस्त्याची अक्षरश: चाळण झाल्यामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना तसेच खड्डे चुकवत जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यावेळी लहान-मोठे अपघातसुद्धा घडत आहेत. एखादा मोठा अपघात घडून एखाद्या निष्पापाचा बळी गेल्यावरच शासनाचे डोळे उघडणार की काय? अशाही संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत.
ग्राम पंचायतीचेही साफ दुर्लक्ष
प्रत्येक ग्रामपंचायतीचा कारभार सुलभ चालावा, विकासाला चालना मिळावी म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्रामविकास अधिकारी, सेक्रेटरी तसेच एस. डी. अधिकाऱ्यांची शासनाने नेमणूक केली. या अधिकारी वर्गाने गावामधील रस्ते दुरुस्ती, गटारी दुरुस्ती, नवीन गटारी बांधणे, पाणी समस्या याची पाहणी करून शासनाला या संदर्भात कळवून आर्थिक निधी मागवून या समस्या सोडविणे गरजेचे असते. परंतु ग्रा.पं. मध्ये शासकीय अधिकारी ‘दिन जान दे पगार आन दे’ अशी भूमिका बजावताना दिसतात, तर ग्रा.पं. सदस्य विकास कामापेक्षा आपली रोजची वरची कमाई कशी होईल, या शोधात असतात. परंतु याचा त्रास बिचाऱ्या नागरिकांना भोगावा लागतो, अशाही प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत.
खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण?
येत्या आठ दिवसात रस्त्याची तात्पुरती डागडुजी न झाल्यास या रस्त्यामध्येच वृक्षारोपण करून वनमहोत्सव साजरा करण्याचा इशारा वाहनधारकांतून देण्यात आला आहे.
नागरिकांचीही जबाबदारी
निवडणुका जवळ आल्या की हेच सदस्य परत निवडून येण्यासाठी मतदारांना पैशाचे आमिष व ओल्या पार्ट्या देवून पुन्हा निवडून देण्यासाठी गळ घालतात, यासाठी रोज ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेतात. परंतु निवडून आल्यावर मात्र हेच सदस्य विकासकामांपासून दूर जातात, पुन्हा निवडणूक एक वर्ष पुढे आल्यावर मतदारांच्या गाठीभेटी घेऊन संपर्कात राहतात. यासाठी विकासकामे करणारा हुकुमी एक्का पडताळणी करून मतदारांनी सदस्यांना निवडून देणे आज गरजेचे आहे, अशाही प्रतिक्रिया जाणकार व तरुण मतदारांतून व्यक्त होताना दिसत आहेत.









