राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष : प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय
वार्ताहर/कणकुंबी
बेळगाव चोर्ला-गोवा रस्ता वेगवेगळ्dया कारणांमुळे नेहमीच वाहनधारक व प्रवासी वर्गाच्या दृष्टीने चर्चेचा विषय ठरला आहे. एक वर्ष तरी खड्याशिवाय चोर्ला रस्त्यावरुन जाता येईल असे वाटत असताना अवघ्या दीड दोन महिन्यातच कणकुंबी ते चोर्लापर्यंतच्या रस्त्याची चाळण झाली आहे. तसेच कणकुंबीपासून ते जांबोटीपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने मेमध्ये डांबरीकरण केलेल्या रस्त्याचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.
रणकुंडये ते गोवा हद्द म्हणजे चोर्ला या 43 कि. मी. पर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 58.90 कोटी रुपये मंजूर केले होते. त्यामधून रस्त्याचे दोन थरांमध्ये डांबरीकरणासाठी केले. मे महिन्यात डांबरीकरण केलेल्या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याची अशी अवस्था होत असेल तर अॅप्रोच रस्त्यांची कल्पनाच न केलेली बरी. अवघ्या महिन्याभरात डांबरीकरण उखडून गेल्याने रस्त्याच्या कामाबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
डांबरीकरणापैकी चोर्ला ते बैलूर क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम 90 टक्के पूर्ण केलेले आहे. परंतु रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्या भरण्याचे काम शिल्लक राहिल्याने वाहन अपघात वाढत आहेत. गेल्या पाच-सहा वर्षांपासून चोर्ला रस्त्याच्या दुतर्फाची माती पावसामुळे वाहून गेल्याने काही ठिकाणी मोठमोठ्या चरी पडल्या आहेत. त्या बुजविण्याची गरज आहे. काही ठिकाणी अर्धा फूट ते दीड फुटापर्यंत पावसाळ्यातल्या चरी तशाच असून रस्त्याच्या बाजूला वाहन घेणे धोकादायक बनले आहे.
गटारी दुरूस्तींची आवश्यकता
रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी दुतर्फा गटारींची नितांत गरज आहे. परंतु चोर्ला रस्त्याच्या बाबतीत गेल्या पाच-सहा वर्षांपासून गटारींची साफसफाई केली नसल्याने गटारी पालापाचोळा व दगड मातीने भरून गेल्या आहेत. पावसाळ्dयात पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी साफ न केल्याने काही ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्याला लागूनच वाहत आहे. त्यामुळे गटारी केवळ नावालाच आहेत. पाण्याचा योग्य तो निचरा होण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गटारी स्वच्छ करणे नितांत गरजेचे आहे. पाऊस संपल्यानंतर गटारींची साफसफाई करण्यात काहीच अर्थ राहणार नाही. पावसाळ्यापूर्वीच साईड पट्या व गटारींची कामे हाती घेऊन वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.









