रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डय़ांचे साम्राज्य : दुरुस्ती करण्याची रहिवाशांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील विविध रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे. मात्र उपनगरातील रस्त्यांच्या विकासाबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. अनगोळ-भाग्यनगर संपर्क रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले असून वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. मात्र कोणतीच दखल घेण्यात आली नाही.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रमुख रस्त्यांसह काही उपनगरातील रस्त्यांची सुधारणा करण्यात आली. मात्र अनगोळ परिसरातील रस्त्यांच्या विकासाच्यादृष्टीने कोणतीच कार्यवाही झालेली नाही. भाग्यनगर ते अनगोळला जोडणाऱया संत मीरा शाळेसमोरील रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. ठिकठिकाणी चरी आणि खड्डे निर्माण झाले आहेत. या रस्त्यावरील डांबर वाहून गेला आहे. झाडे असलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी पडून डांबर उखडला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणे मुश्कील बनले आहे.
विकासाबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष
या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असते. भाग्यनगर आणि वडगाव अशा विविध परिसरातील वाहनधारक या रस्त्याचा वापर करतात. वडगाव, भाग्यनगर, जुनेबेळगाव आदी परिसरातून उद्यमबाग औद्योगिक वसाहतीमध्ये कामाला जाणारे कामगार या रस्त्याने ये-जा करीत असतात. त्यामुळे हा रस्ता सोयीचा आहे. पण रस्ता खराब झाल्याने रात्री-अपरात्री वाहनधारकांना अडचणीचे बनले आहे. रस्त्यावरून ये-जा करताना अपघात घडत आहेत. या रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्त्याचा विकास करण्यात यावा, अशी मागणी सातत्याने करण्यात आली होती. मात्र महापालिकेने कोणतीच उपाय-योजना हाती घेतली नाही. परिणामी हा रस्ता वाहनधारकांसाठी धोकादायक बनला आहे. महत्त्वाच्या रस्त्याचा विकास करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.









