रस्ता दुरुस्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : सध्या पॅचवर्क, पावसाळ्यानंतर डांबरीकरण
वार्ताहर/उचगाव
बेळगाव-बाची या कर्नाटक हद्दीतील रस्त्याची अक्षरशा चाळण झाली असून, प्रवासी वर्गाला वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. यासाठी सुळगा, कल्लेहोळ, तुरमुरी, उचगाव फाटा, बेळगुंदी फाटा, बाची या ठिकाणी रस्त्यावर बरेच खड्डे पडले आहेत. ते तातडीने पॅचवर्क करावे अशा आशयाचे निवेदन या भागातील प्रवासी आणि ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना देऊन रस्ता दुरुस्तीसाठी गुरुवारी विनंती केली आहे. निवेदनप्रसंगी उचगाव विभाग श्रीराम सेना पदाधिकारी, या भागातील असंख्य प्रवासी, गावकरी आणि वकिलानी सकाळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन देऊन या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी आणि प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी. सध्या तातडीने पॅचवर्क करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी देऊन तातडीने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना अशा प्रकारचे निर्देश देऊन सध्या पावसाळा असल्याने खड्डे बुजवून पॅचवर्क करावे आणि पाऊस संपल्यानंतर या रस्त्याचे डांबरीकरण करावे अशा सूचना यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. निवेदन देण्यासाठी अॅड. अण्णासाहेब घोरपडे, अॅड. शरद देसाई, प्रफुल चौगुले, परशराम मण्णूरकर, श्रीकांत चौगुले, सचिन कदम यासह या भागातील नागरिक वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पॅचवर्क न केल्यास 15 दिवसानंतर रास्ता रोको
बेळगाव वेंगुर्ले मार्गावरील गणेश मंदिर ते कर्नाटक महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या पंधरा किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे तातडीने पॅचवर्क करावे. अन्यथा येत्या पंधरा दिवसानंतर या मार्गावर रास्ता रोको करून खड्यातून वृक्षारोपण करण्यात येईल असा इशारा या भागातील जनतेतर्फे देण्यात आला आहे.
– प्रफुल चौगुले, उचगाव.










