वयाच्या आठव्या वर्षी बेपत्ता झालेल्या एका मुलीची ही अविश्वसनीय कहाणी आहे. 22 फेब्रुवारी 1985 या दिवशी अमेरिकेच्या पेन्सिल्व्हानिया प्रांतात एक शाळकरी मुलगी अचानक बेपत्ता झाली. ती शाळेच्या वाहनातून घरी परत येत होती. ती वाहनातून उतरली पण घरी पोहचली नाही. पुष्कळ शोधल्यानंतरही तिचा पत्ता लागला नाही. काही लोकांनी तिला बसस्टँडजवळ पाहिले होते. तथापि, पोलिसांनाही तिचा शोध घेता आला नाही. कालांतराने घटना विसरली गेली.
चेरी मेहन असे तिचे नाव होते. गेल्यावर्षी ही मुलगी अचानकपणे 46 वर्षांच्या महिलेच्या स्वरुपात समोर आली. 1985 मध्ये हरविलेली जी मुलगी होती. ती मीच आहे, असे या महिलेचे प्रतिपादन आहे. तथापि, तिच्या वृद्ध झालेल्या आईचा तिच्या प्रतिपादनावर विश्वास नाही. याचे कारण असे की गेल्या सात आठ वर्षांमध्ये अशा अनेक महिला आपण ‘चेरी’ आहोत असे सांगत आलेल्या आहेत.
तिच्या आईला हा तोतयेगिरीचा प्रकार वाटतो. तथापि, ही 46 वर्षांची महिला आपल्या घराच्या खाणाखुणा नेमकेपणाने सांगते. ती हरविली तेव्हा आठ वर्षांची होती. त्यामुळे तिला आपले बालपण आठवते. ती त्यावेळचे जे संदर्भ सांगते, ते अचूक आहेत, असे अनेकांचे मत आहे. तसेच हरविल्यानंतर आपण कोठे गेलो हे ही ती संगतवार सांगते. मात्र, अद्याप तिची ओळख अधिकृतरित्या सिद्ध झालेली नाही. आता डीएनए परीक्षणाच्या माध्यमातूनच सत्य सिद्ध होण्याची शक्यता आहे.