टँकरने विकत घेण्याची वेळ : तातडीने पाण्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी
वार्ताहर /उचगाव
तुरमुरी ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील बाची गावातील नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी माळोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे. अनेक नागरिक जिथे मिळेल तेथून पाणी आणण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र असून काही नागरिकांवर टँकरने विकत पाणी घेऊन जगण्याची वेळ आली आहे. तुरमुरी ग्रा. पं.च्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे बाची गावातील नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे मोठे हाल होत असून तातडीने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बाची गावामध्ये सध्या दोन सार्वजनिक विहिरी आहेत. एका विहिरीला पाणी मुबलक आहे. पण या विहिरीची दुरुस्ती न केल्याने पाण्याचा उपसा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. जर विहिरीची दुरुस्ती केली तर गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा बहुतांश प्रश्न सुटेल. याबरोबरच दुसऱ्या विहिरीला देखील पाणी आहे. मात्र त्याची देखभाल नसल्याने या विहिरीतील पाण्याचा उपसा योग्यप्रकारे होत नाही. याबरोबरच गावामध्ये दोन कूपनलिका आहेत. कूपनलिकांचीही दुरुस्ती न झाल्याने संपूर्ण गावावर पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट ओढवले आहे. सदर गाव डोंगराच्या कुशीत वसले असून जवळपास मार्कंडेय नदी वाहत असते. मात्र सध्या नदीचे पात्र कोरडे पडल्याने आणि शेतवडीतील विहिरींच्या पाण्याची पातळीही खालावल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठे कष्ट सोसावे लागत आहेत. असेच काही दिवस गेले तर लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. यासाठी ग्रा.पं.ने तातडीने विहिरींची व कूपनलिकांची दुरुस्ती करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी येथील अनेक नागरिकांनी केली आहे. सध्या अनेक नागरिकांवर पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. तुरमुरी ग्रा.पं.ने तातडीने पावले उचलून पाणीप्रश्न निकालात काढावा, अशी मागणी होत आहे.
ग्रा.पं.ने पाण्याची सोय करावी, अन्यथा ग्रा.पं.ला टाळे ठोकू
ग्रामपंचायतला पिण्याच्या पाण्यासंदर्भात अनेकवेळा जाऊन हेलपाटे मारुन बाची गावातील पाण्याचा प्रश्न निदर्शनास आणून देण्यात आला. मात्र याकडे जाणून-बुजून ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे. विहिरीला पाण्याचा साठा असताना देखील विहिरींची दुरुस्ती केली जात नाही. परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. यासाठी तातडीने ग्रा.पं.ने पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अन्यथा ग्रामपंचायतीला टाळे ठोकू. राज्य सरकारने देखील पाण्यासाठी भरपूर निधी राखीव ठेवलेला असतानाही ग्रामपंचायत याकडे साफ दुर्लक्ष करत आहे.
– सचिन बाळेकुंद्री









