ऑनलाईन टीम / तरुण भारत :
नाशिक महापालिका आयुक्तांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हात उगारणे माजी मंत्री बच्चू कडू यांना चांगलंच भोवलं आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणी बच्चू कडू यांना दोषी ठरवत दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर कडू यांना तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला आहे.
नाशिक महापालिकेने दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही, म्हणून 2017 मध्ये प्रहार संघटनेने नाशिक महापालिकेवर आंदोलन केले होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली होती. त्यावेळी बच्चू कडू यांनी आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अंगावर धावून जात त्यांना शिवीगाळ केली होती. तसेच त्यांच्यावर हातही उगारला होता. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवला होता.
या वादानंतर आयुक्त कृष्णा यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यानंतर आता न्यायालयाने शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी 1 वर्ष तर सरकारी अधिकाऱयाला अपमानित केल्याप्रकरणी 1 अशी 2 वर्षांची शिक्षा कडू यांना सुनावली आहे.
अधिक वाचा : भारतीय वंशाचे अरुण सुब्रमण्यम दक्षिण आशियाचे पहिले न्यायाधीश








