एका तरुणाने आपल्यापेक्षा जवळपास निम्म्या उंचीच्या तरुणीही केलेला विवाह सध्या अमेरिकेत गाजत आहे. या जोडप्यातील पतीची उंची आहे, सहा फुटाहून अधिक, तर पत्नीची आहे अवघी चार फूट. या पतीचे नाव ऑस्टिन असे असून पत्नीचे टिफनी असे आहे. त्यांच्या उंचीतील अंतर हा सध्या अनेकांच्या चर्चेचा विषय झाला असून लोक विविध प्रकारच्या विनोदी आणि उपहासात्मक कॉमेंटस् त्यांच्यावर करीत आहेत. टिफनी ही इतकी ठेंगू आहे, की ही जोडी रस्त्यांमधून चालताना, कित्येकदा ती पाहणाऱ्याच्या दृष्टीतही येत नाही. अशा ठेंगू महिलेला वैद्यकीय भाषेत ‘बोनी’ असे संबोधले जाते. मात्र, ही तरुणी स्वत:ला ‘लिटिल पर्सन’ किंवा छोटी व्यक्ती असे म्हणवून घेते. 11 वर्षांपासून ते एकमेकांना परिचित आहेत. या जोडप्यांवर ज्या कॉमेंटस् होत आहेत, त्यात ‘तू एका बालिकेशी विवाह का केलास’ किंवा ‘बच्ची’ से शादी क्यों की, हा प्रश्न विषेश लोकप्रिय आहे.
काही लोकांनी असा विवाह किंवा असे संबंध बेकायदेशीर असल्याचाही आरोप केला आहे. तथापि, ही जोडी अशा टिप्पणींकडे दुर्लक्ष करुन आपल्या जीवनात पुढे जात आहेत. आपल्या जीवनातील अनेक घटना त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्धही केल्या आहेत. आपण ठेंगू असलो, तरी आपल्याला सर्वसामान्य उंचीची अपत्ये होऊ शकतात, असे डॉक्टरांचे म्हणणे असल्याचे टिफनी हिने स्पष्ट केले आहे. मी सर्वसामान्य महिलांपेक्षा वेगळी नाही. केवळ माझी उंची वाढली नाही, याचा अर्थ माझी क्षमता कमी आहे, असा होत नाही, असे तिचे मत आहे.
या दोघांना एकमेकांची जवळीक साधताना मात्र बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते. हे दोघे उभे राहिले, तर टिफनीचे डोके त्याच्या कमरेपेक्षा थोड्या अधिक उंचीवर लागते. तिच्याशी बोलतानाही त्याला कमरेत वाकावे लागते. आपले सहजीवन सुखावह व्हावे यासाठी त्यांनी घरातील प्रत्येक खोलीत विशिष्ट प्रकारच्या खुर्च्या आणि स्टूल ठेवले आहेत. उंचीतील अंतर आपल्या सहजीवनात कोणत्याही प्रकारचा अडथळा करु शकत नाही, असे या दोघांनीही आवर्जून स्पष्ट केले आहे. थोड्या प्रमाणात अॅडजेस्टमेंट करावी लागते. तथापि, त्यांचे सहजीवन इतर सर्वसामान्य लोकांसारखेच आहे, हे दोघेही आवर्जून आणि आग्रहाने नमूद करतात.









