ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागांवर निवडणूक लढेल. उर्वरित 48 जागा शिंदे गट आणि मित्रपक्षांना मिळतील, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. बावनकुळेंच्या या विधानामुळे राज्यात विविध चर्चांना उधाण आले असून, राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत आहेत. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी देखील या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सूचक वक्तव्य केलं आहे.
बच्चू कडू म्हणाले, आगामी विधानसभेत 240 जागा लढवण्याचा भाजपाचा विचार असून, कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे चंद्रशेखर बानवकुळे यांनी म्हटले होते. बावनकुळेंचे हे वक्तव्य म्हणजे भाजपची भूमिका आहे की, त्यांनी चुकून केलेलं वक्तव्य आहे, हे तपासलं पाहिजे. आम्ही शिंदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. युतीचं अजून आमचं काही ठरलं नाही. येणाऱ्या विधानसभेमध्ये युती करायची, नाही करायची, किती जागा देणार, नाही देणार त्याचं अजून काही ठरलेलं नाही. येणाऱ्या काळामध्ये त्याबाबत निर्णय घेतला जाईल. पुढच्या दीड वर्षात काय होईल, हे आत्तच सांगता येणार नाही.
अधिक वाचा : राज्यात आणखी दोन दिवस ‘यलो अलर्ट’
दरम्यान, बच्चू कडू यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा सत्तापालट होणार की काय, अशा चर्चांना आता उधाण आलं आहे.







