गोव्यासाठी ऐतिहासिक कामगिरी : मुख्यमंत्री, क्रीडा मंत्र्यांकडून अभिनंदन
फोंडा : समस्त गोमंतकीयांना गौरवास्पद अशी गोष्ट काल गुरुवारी फोंडा क्रीडा प्रकल्पात घडली. 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या मॉडर्न पॅन्टाथ्लॉन स्पर्धेत गोव्याच्या बाबू अर्जुन गावकरने लेसर रन प्रकारात सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले आहे. त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कृषीमंत्री रवी नाईक व क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांनी बाबू गावकर याचे अभिनंदन केले. बाबू गावकर याचा काल गुरुवारी वाढदिवस होता. नेत्रावळी सांगे येथील बाबू हा कला शाखेचा पदवीधर आहे. आपल्या यशाचे श्रेय त्याने आईवडील, प्रशिक्षक व प्रोत्साहन देणाऱ्यांना दिले आहे. आपण पूर्वी मॅरथॉन स्पर्धेत धावायचो. परंतु लेसर गन शुटींगसाठी मला महागडे असे गन उपलब्ध करून दिल्याबद्दल त्याने प्रशिक्षक, गोवा पॅन्टाथ्लॉन संघटनेचे पदाधिकारी व नोडल अधिकारी नीलेश नाईक यांचे आभार व्यक्त केले. प्रशिक्षक सावियो लैतांव, किर्तन वैज व विरेंद्र माजीक यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. बाबू याचे वडिल ट्रॅक्टर मॅकनिक तर आई गृहिणी आहे.









