ड्रोनद्वारे पाळत : 53 हिंदू नेत्यांना अटक, अन्य 30 जण ताब्यात
वृत्तसंस्था/ मथुरा
अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्याच्या 31 व्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर बुधवार, 6 डिसेंबरला मथुरेत हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. सावधगिरीची उपाययोजना म्हणून पोलिसांनी 53 हिंदू नेत्यांना अटक केली. तसेच हिंदू नेते दिनेश शर्मा यांच्यासह अन्य 30 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. सदर नेतेमंडळी श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मूळ गर्भगृहात दीपदान करणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.
मथुरा जिह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. शाही मशिदीत जलाभिषेक आणि दिवे लावण्याबाबत हिंदू संघटनांनी चर्चा केली होती. त्यानंतर जलाभिषेक आणि दीपप्रज्वलन करण्यासाठी येणाऱ्या हिंदू नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. याचदरम्यान मशीद आणि मंदिराच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली होती. हाय अलर्टमुळे मथुरेत अनेक ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली. याबाबत वाहतूक पोलिसांकडून डायव्हर्जन प्लॅन तयार करण्यात आला होता. मंदिर आणि मशिदीकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर लहान-मोठ्या सर्व वाहनांना प्रवेशबंदी घालण्यात आली होती. तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवली जात होती. आरएएफ, स्थानिक गुप्तचर विभाग आणि आयबीचे पथक लक्ष ठेवून होते.









