कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा मुद्दा : साक्षीवर काँग्रेसधार्जिणी भूमिका स्वीकारल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ पानिपत
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण आणि कुस्तीपटूंमधील वादादरम्यान कुस्तीपटू साक्षी मलिक अन् बबिता फोगट आमनेसामने आल्या आहेत. राजकारण करायचे असल्यास थेट राजकारणात उतर असे आव्हान बबिताने साक्षी मलिकला दिले आहे. साक्षीची वक्तव्ये पाहिल्यास ती कुस्तीपटूंच्या बाजूने आहे का काँग्रेस प्रवक्ता, हेच समजत नसल्याची टीका बबिताने केली आहे.
अनुमती पत्रावर माझी स्वाक्षरी नसल्याचा पुनरुच्चार बबिताने केला आहे. बबिता फोगटनेच आंदोलन करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. तसेच तिने आंदोलनासाठीची अनुमती मिळवून दिल्याचा दावा साक्षीने केला होता. या पार्श्वभूमीवर दोघींमध्ये आता वाक्युद्ध पेटले आहे.
दीपेंद्र हु•ांचे नाव घेऊन आरोप होत आहे, परंतु आजपर्यंत काँग्रेसच्या कुठल्याच नेत्याने स्वत:च्या बचावाकरता वक्तव्य केलेले नाही. तरीही साक्षी मलिक काँग्रेसच्या बाजूने बोलत आहे. दीपेंद्र हु•ा हे 2012 पासून सातत्याने हरियाणा कुस्ती महासंघाचे अध्यक्ष राहिले होते. त्या कालावधीत त्यांनी कधीच महिला कुस्तीपटूंची पर्वा केली नाही. अशा स्थितीत साक्षी या आंदोलनात काँग्रेसच्या हातची बाहुली ठरल्यासारखी वागत होती. आंदोलनात सामील असलेल्या लोकांवर तिचे पूर्ण नियंत्रण होते असा आरोप बबिताने केला आहे.
खाप पंचायतींचा वापर
साक्षी मलिक बेछूट आरोप करत असल्याचे पाहून एक भारतीय तसेच कुस्तीपटू म्हणून माझा संताप होत होता. साक्षी आता याचे खापर इतरांच्या माथी मारून स्वत: नामानिराळी राहू पाहत आहे. खाप पंचायतींच्या विरोधात जाण्याचा मी विचारही करू शकत नाही. मी देखील याच समाजाचा हिस्सा आहे. परंतु खाप पंचायतींचा वापर करून त्यांचे महत्त्व कमी केले जाऊ नये असे बबिताने साक्षीला सुनावले आहे.
सत्याचा विजय होणार
साक्षी मलिकने काँग्रेसच्या सांगण्यावरून सर्वकाही केल्याचे आता जगजाहीर झाले आहे. माझ्या कुठल्याही बहिणीसोबत गैरप्रकार घडला असेल तर मी तिच्यासोबत उभी राहणार आहे. प्रसंगी मला त्याग करावा लागला तरीही माझी तयारी आहे, परंतु माझा न्यायप्रक्रियेवर पूर्ण विश्वास आहे. चुकीचे कृत्य करणाऱ्याला शिक्षा होईल अन् सत्याचा विजय होईल असे बबिताने म्हटले आहे.









