उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे कारवाई : 3 हँडग्रेनेड, 2 डिटोनेटर, 13 काडतुसे जप्त,तपास यंत्रणांना सतर्कतेचा इशारा
वृत्तसंस्था/लखनौ
बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) आणि आयएसआय मॉड्यूलचा कुख्यात दहशतवादी आणि पंजाबमधील अमृतसर येथील रहिवासी लाझर मसीह याला गुरुवारी सकाळी उत्तर प्रदेशात अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश एसटीएफ आणि पंजाब पोलिसांनी संयुक्त कारवाई करत कौशांबी येथे त्याला गजाआड करण्यात आले. अटक केलेला दहशतवादी बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या जर्मन-आधारित मॉड्यूलचा प्रमुख स्वर्ण सिंग उर्फ जीवन फौजीसाठी काम करत होता. तसेच तो पाकिस्तान-आधारित आयएसआय कार्यकर्त्यांशी थेट संपर्कात असल्याचेही उघड झाले आहे.
उत्तर प्रदेश एसटीएफने दिलेल्या माहितीनुसार, लाझर मसीह या दहशतवाद्याकडून 3 जिवंत हँडग्रेनेड, 2 डिटोनेटर्स, 13 काडतुसे आणि 1 परदेशी पिस्तूलसह बेकायदेशीर शस्त्रs आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. तसेच गाझियाबादचा पत्ता असलेले आधार कार्ड, सिमकार्ड आणि मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे. हा दहशतवादी गेल्यावर्षी 24 सप्टेंबर रोजी पंजाबमधील न्यायालयीन कोठडीतून पळून गेला होता. तो मूळचा पंजाबमधील अमृतसर जिह्यातील मकोवाल परिसरातील रामदास थाना येथील कुर्लियान गावचा रहिवासी आहे.
तपास यंत्रणांना सतर्कतेचा इशारा
उत्तर प्रदेश एसटीएफ आणि गुप्तचर संस्था यांच्याकडून लाझरच्या अटकेला भारतातील दहशतवादी कटाशी संबंधित मोठे यश मानले जात आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून लवकरच अधिक खुलासे होण्याची शक्यता आहे. लाझरच्या अटकेनंतर त्याच्या संपर्कात असलेल्या इतर संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तपास यंत्रणांनी इतरांच्या शोधासाठी व्यापक मोहीम सुरू केली असून सतर्कतेचा इशाराही जारी केला आहे.
गाझियाबाद-एनसीआरशी संबंधित दहशतवादी
उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आलेल्या बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या एका सक्रिय दहशतवाद्याचा गाझियाबादच्या एनसीआर शहराशी संबंध असल्याचे आढळून आले आहे. त्याच्याकडून जप्त केलेल्या कागदपत्रांमध्ये एनसीआरच्या गाझियाबाद जिह्यातील आधारकार्ड सापडले. पोलिसांनी याचा तपास सुरू केला आहे. सदर आधार कार्ड कोणत्या केंद्रातून बनवले आहे? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. तसेच आधार कार्ड बनवण्यासाठी कोणी मदत केली? गाझियाबादमध्येही कोणी नेटवर्क सदस्य आहे का? या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी तपास सुरू आहे.
गेल्यावर्षी कोठडीतून फरार
लाझर मसीह हा पंजाबमधील अमृतसर रामदास भागातील कुर्लियान गावचा असल्याचे सांगितले जाते. तो गेल्यावर्षी 24 सप्टेंबर रोजी पंजाबमधील न्यायालयीन कोठडीतून पळून गेला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा सतत शोध घेत होते. उत्तर प्रदेश एसटीएफ आणि गुप्तचर संस्था दहशतवाद्याच्या अटकेला भारतातील दहशतवादी कटाशी संबंधित मोठे यश मानत आहेत. जप्त केलेली स्फोटके उत्तर प्रदेश एसटीएफ आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी निकामी केली आहेत.









