वृत्तसंस्था/ कराची
यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सोमवारी येथे सुरु झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत कर्णधार बाबर आझमच्या नाबाद शतकाच्या जोरावर (161) यजमान पाकने पहिल्या डावात 5 बाद 317 धावा जमविल्या. या कसोटीत सोमवारी खेळाच्या पहिल्या दिवशी अनेक नवे विक्रम नोंदविले गेले. सर्फराज अहमदने शानदार अर्धशतक झळकविले.
न्यूझीलंडचा क्रिकेट संघ 2002 नंतर प्रथमच पाकच्या भूमीवर कसोटी मालिका खेळत आहे. उभय संघात पाकमध्ये ही कसोटी मालिका तब्बल 20 वर्षानंतर होत असल्याचा एक विक्रम नोंदविला गेला आहे. त्याचप्रमाणे पाक संघातील अनुभवी फलंदाज आणि यष्टीरक्षक सर्फराज अहमदची ही 50 वी कसोटी असून त्याला पहिल्यांदाच त्याच्या घरच्या मैदानावर खेळण्यासाठी संधी मिळाली. सर्फराज अहमदचाही हा एक विक्रम म्हणावा लागेल. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार विल्यम्सनने पाकच्या डावातील चौथ्या षटकातच फिरकी गोलंदाज अझाज पटेलकडे चेंडू सोपविला. अझाज पटेलने आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरविताना पाकचा सलामीचा फलंदाज अब्दुल्ला शफिकला 7 धावांवर ब्लंडेलकरवी यष्टीचीत केले. शफिक बाद झाल्यानंतर 3 षटकांच्या अंतराने स्पिनर ब्रेसवेलच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक ब्लंडेलने शान मसूदला 3 धावांवर यष्टीचीत केले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिले 2 फलंदाज यष्टीचीत होण्याचा हा पहिलाच व एकंदर दुसरा प्रसंग आहे. यापूर्वी महिलांच्या कसोटी क्रिकेटमध्ये असा विक्रम नोंदविला गेला आहे. 1976 साली जमैका येथे ऑस्ट्रेलिया आणि विंडीज यांच्यातील कसोटी सामन्यात असा विक्रम झाला होता.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. त्यांचे पहिले 3 फलंदाज केवळ 48 धावात बाद झाले. न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांनी खेळाचे पहिले सत्र गाजविले. न्यूझीलंडच्या पटेलने शफीकला चौथ्या षटकात यष्टीचीत केले. त्याने 7 धावा जमविल्या. त्यानंतर 7 व्या षटकात ब्रेसवेलने शान मसुदला 3 धावांवर यष्टीचीत केले. ब्रेसवेलने पाकला आणखी एक धक्का देताना 15 व्या षटकात इमाम ऊल हक्कला झेलबाद केले. त्याने 5 चौकारांसह 24 धावा जमविल्या. उपहारापूर्वी पाकने आणखी एक गडी गमविला. न्यूझीलंडच्या साऊदीने शकिलला झेलबाद केले. त्याने 2 चौकारांसह 22 धावा जमविल्या. खेळाच्या पहिल्या सत्राअखेर पाकची स्थिती 4 बाद 115 अशी होती.
पण त्यानंतर कर्णधार बाबर आझम आणि सर्फराज अहमद या जोडीने 5 व्या गडय़ासाठी 196 धावांची भागिदारी करुन आपल्या संघाला सावरले. बाबर आझमने कसोटीतील आपले 9 वे शतक झळकविले. 2022 च्या क्रिकेट हंगामात बाबर आझमचे हे कसोटीतील चौथे शतक आहे. न्यूझीलंडच्या पटेलने सर्फराज अहमदला डॅरिल मिचेलकरवी झेलबाद केले. सर्फराज अहमदने 153 चेंडूत 9 चौकारांसह 86 धावा झळकाविल्या.
न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी खेळाच्या शेवटच्या सत्रात पाकचा 5 वा गडी बाद केला. बाबर आझम 277 चेंडूत 1 षटकार आणि 15 चौकारांसह 161 धावांवर तर आगा सलमान 3 धावांवर खेळत आहेत. कर्णधार बाबर आझमने 2022 च्या क्रिकेट हंगामात कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा ओलांडला असून आता त्याच्या 1100 धावा झाल्या आहेत. यामध्ये 4 शतके आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. या वर्षीच्या प्रारंभी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कराचीतील सामन्यात बाबर आझमने 196 धावांची सर्वोत्तम खेळी केली होती. तसेच त्याने गॅले येथे लंकेविरुद्ध 119 तर रावळपिंडीत इंग्लंडविरुद्ध 136 धावा झळकविल्या होत्या. बाबर आझमला न्यूझीलंडच्या मिचेलने ब्रेसवेलच्या गोलंदाजीवर जीवदान दिले होते, त्यावेळी तो 12 धावावर होता. या जीवदानाचा लाभ घेत त्याने दिडशतकापर्यंत मजल मारली आहे. पाक संघाला गेल्या आठवडय़ात इंग्लंडकडून कसोटी मालिकेत व्हाईटवॉश मिळाला होता. त्यानंतर पाकच्या निवड समितीने न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सर्फराज अहमद आणि मीर हमझा यांची निवड केली आहे. न्यूझीलंड संघातर्फे अझाज पटेल आणि ब्रेसवेल यांनी प्रत्येकी 2 तर साऊदीने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः पाक प. डाव – 90 षटकात 5 बाद 317 (बाबर आझम खेळत आहे 161, सर्फराज अहमद 86, इमाम ऊल हक 24, शफिक 7, शकिल 22, सलमान खेळत आहे 3, अझाज पटेल 2-91, ब्रेसवेल 2-61, साऊदी 1-51).









