सलग 9 अर्धशतके झळकावणारा पहिला फलंदाज
वृत्तसंस्था/ मुल्तान
यजमान पाकने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत विंडीजवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. शुक्रवारी येथे झालेल्या या मालिकेतील दुसऱया सामन्यात पाकने विंडीजचा 120 धावांनी दणदणीत पराभव केला. कर्णधार बाबर आझम आणि इमाम उल हक यांनी शानदार अर्धशतके झळकविली. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सलग 9 अर्धशतके झळकविण्याचा पराक्रम करणारा बाबर आझम हा पहिला फलंदाज आहे.
शुक्रवारच्या दुसऱया सामन्यात पाकने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 275 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजचा डाव 32.2 षटकांत 155 धावा आटोपला.
पाकच्या डावामध्ये कर्णधार बाबर आझमने 93 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 77, इमाम उल हकने 72 चेंडूत सहा चौकारांसह 72, शदाब खानने 23 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 22, खुशदिल शहाने 31 चेंडूत 2 चौकारांसह 22, मोहम्मद वासीमने 13 चेंडूत 1 षटकार आणि एक चौकारांसह नाबाद 17, शाहीन आफ्रिदीने 6 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 15, झमानने 3 चौकारांसह 17, मोहम्मद रिझवान 15 धावा जमविल्या. पाकच्या डावात 3 षटकार आणि 22 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे अकिल हुसेनने 52 धावांत 3, जोसेफ आणि फिलीप यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
पाकचा कर्णधार बाबर आझमने पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही प्रकारात सलग 9 अर्धशतके नोंदविण्याचा पराक्रम केला. बाबर आझमने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱया आणि शेवटच्या कसोटीत पहिल्या डावात 66 तर दुसऱया डावात 55 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाविरूद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत बाबर आझमने 57, 114, नाबाद 105 धावा झळकविल्या तर त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकमेव टी-20 सामन्यात त्याने 66 धावा जमविल्या होत्या.
बुधवारी मुल्तान झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात आझमने शानदार शतक झळकविले होते. बाबर आझमने दोन वेगवेगळय़ा वनडे मालिकेत सलग तीन शतके नोंदविली असून असा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज आहे. या पहिल्या वनडे सामन्यात त्याने 107 चेंडूत 103 धावा जमवित पाकला 5 गडय़ांनी विजय मिळवून दिला होता. वनडे क्रिकेटमध्ये कर्णधारपद सांभाळताना बाबर आझमने जलद 1000 धावांचा टप्पा गाठला असून त्याने भारताच्या विराट कोहलीचा विक्रम मागे टाकला आहे.
शुक्रवारच्या दुसऱया सामन्यात पाकच्या भेदक गोलंदाजीसमोर विंडीजचा डाव 32.2 षटकांत 155 धावांत आटोपला. विंडीजच्या डावात मेयर्सने 25 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 33, ब्रुक्सने 56 चेंडूत 1 षटकार आणि चौकारांसह 42, कर्णधार पुरनने 36 चेंडूत 1 षटकार आणि एक चौकारांसह 25, अकिल हुसेनने 1 चौकारांसह नाबाद 14 धावा जमविल्या. विंडीजच्या डावात 5 षटकार आणि 7 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे मोहम्मद नवाजने 19 धावांत 4, मोहम्मद वासीमने 34 धावांत 3, शदाब खानने 40 धावांत 2 तर शाहीन आफ्रिदीने 17 धावांत 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
पाक 50 षटकांत 8 बाद 275 (बाबर आझम 77, इमाम उल हक 72, झमान 17, रिझवान 15, शदाब खान 22, खुशदील शहा 22, मोहम्मद वासीम नाबाद 17, शाहीन आफ्रिदी नाबाद 15, अकिल हुसेन 3-52, जोसेफ 2-33, फिलीप 2-50), विंडीज 32.2 षटकांत सर्वबाद 155 (ब्रुक्स 42, मेयर्स 33, पुरन 25, अकिल हुसेन नाबाद 14, पॉवेल 10, मोहम्मद नवाज 4-19, मोहम्मद वासीम 3-34, शदाब खान 2-40, शाहीन आफ्रिदी 1-17).









