दुसऱया टी-20 सामन्यात यजमान इंग्लंडचा 10 गडी राखून फडशा
कराची / वृत्तसंस्था
बाबर आझम (66 चेंडूत नाबाद 110) व मोहम्मद रिझवान (51 चेंडूत नाबाद 88) यांच्या तडाखेबंद फलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने येथील दुसऱया टी-20 सामन्यात यजमान इंग्लंडचा 10 गडी राखून एकतर्फी फडशा पाडला आणि 7 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी प्राप्त केली. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 बाद 199 धावा केल्या तर प्रत्युत्तरात पाकिस्तानने 19.3 षटकात बिनबाद 203 धावांसह एकतर्फी विजय संपादन केला.
प्रारंभी, इंग्लंडने कर्णधार मोईन अली (23 चेंडूत 55) व बेन डकेट (22 चेंडूत 43) यांच्या फटकेबाजीमुळे द्विशतकाच्या उंबरठय़ापर्यंत जोरदार झेप घेतली. पाकिस्तानतर्फे हॅरिस रौफ व शाहनवाज दहानी यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. हॅरिसने 4 षटकात 30 धावात 2 बळी तर दहानीने 4 षटकात 37 धावात 2 बळी, असे पृथक्करण नोंदवले.
विजयासाठी 200 धावांचा पाठलाग करताना बाबर आझम व रिझवान यांनी प्रारंभापासूनच इंग्लिश गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला आणि यजमान संघ यातून शेवटपर्यंत सावरु शकला नाही. विजयासाठी षटकामागे 10 धावांची सरासरी आवश्यक असतानाही पाकिस्तानने रिझवान-आझमच्या झंझावातामुळे सहज विजय संपादन केला. रिझवानने पहिल्या षटकात दोन चौकार फटकावत आपले इरादे स्पष्ट केले तर सॅम करणच्या तिसऱया षटकात बाबर आझमने आणखी दोन चौकार मिळवत इंग्लिश गोलंदाजांवर अधिक दडपण आणले.
उभयतांच्या या फटकेबाजीमुळे पाकिस्तानने पॉवर प्लेच्या 6 षटकात बिनबाद 59 धावांपर्यंत मजल मारली. नंतरही त्यांनी चौफेर फटकेबाजीत काहीही कसर सोडली नाही. रिझवानने 30 तर बाबर आझमने 39 चेंडूत आपली अर्धशतके साजरी केली. या दोघांचा आक्रमक पवित्रा पाहता इंग्लिश कर्णधार मोईन अली स्वतः गोलंदाजीला आला. पण, त्याच्या पहिल्याच षटकात रिझवान व आझम यांनी एकत्रित 3 षटकारांसह 21 धावांची लयलूट करत हा प्रयत्न देखील फोल ठरवला. आदिल रशिदच्या डावातील 15 व्या षटकात पाकिस्तानने आणखी दोन षटकार नोंदवले.
अर्धशतक साजरे केल्यानंतर बाबर आझमने आणखी आक्रमक पवित्र्यावर भर दिला. पहिले अर्धशतक 39 चेंडूत पार केल्यानंतर पुढील अर्धशतक तर त्याने अवघ्या 23 चेंडूतच सर केले. टी-20 क्रिकेटमध्ये दोन शतके झळकावणारा तो पाकिस्तानचा पहिला फलंदाज ठरला.
मोईन अलीची फटकेबाजी
प्रथम फलंदाजी करणाऱया इंग्लिश संघातर्फे मोईन अलीने 23 चेंडूत 4 चौकार व 4 षटकारांसह 55 धावांची आतषबाजी केली. त्याला बेन डकेटची (22 चेंडूत 43) उत्तम साथ लाभली. सॉल्टने 30 तर हॅलेसने 26 धावा केल्या. पाकतर्फे दहानी, रौफ यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले तर मोहम्मद नवाझने 4 षटकात 40 धावात 1 बळी असे पृथक्करण नोंदवले.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड ः 20 षटकात 5 बाद 199 (मोईन अली 23 चेंडूत 4 चौकार, 4 षटकारांसह 55, बेन डकेट 22 चेंडूत 7 चौकारांसह 43, फिल सॉल्ट 27 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह 30, ऍलेक्स हॅलेस 21 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह 26. अवांतर 4. शाहनवाज दहानी 4 षटकात 2-37, हॅरिस रौफ 4 षटकात 2-30. मोहम्मद नवाझ 4 षटकात 1-40).
पाकिस्तान ः 19.3 षटकात बिनबाद 203 (मोहम्मद रिझवान 51 चेंडूत 5 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 88, बाबर आझम 66 चेंडूत 11 चौकार, 5 षटकारांसह नाबाद 110. अवांतर 5).
पाकिस्तानतर्फे टी-20 मधील धावांचा यशस्वी पाठलाग
प्रतिस्पर्धी / टार्गेट / ठिकाण
विंडीज / 208 / कराची
द. आफ्रिका / 204 / सेंच्युरियन
इंग्लंड / 200 / कराची
द. आफ्रिका / 189 / जोहान्सबर्ग
ऑस्ट्रेलिया / 184 / हरारे.
टी-20 मध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वोच्च भागीदारी
खेळाडू / सामना / वर्ष / धावा
बाबर आझम व रिझवान /पाकिस्तान वि. इंग्लंड / 2022 / 203 ना.
बाबर आझम व रिझवान / पाकिस्तान वि. द. आफ्रिका / 2021 / 197
गप्टील व केन विल्यम्सन / न्यूझीलंड वि. पाकिस्तान / 2016 / 171 ना.
बाबर आझम वि. रिझवान / पाकिस्तान वि. विंडीज / 2021 / 158
बाबर आझम वि. रिझवान / पाकिस्तान वि. भारत / 2021 / 152 ना.









