वृत्तसंस्था/ कराची
पाक क्रिकेट संघाचा कर्णधार तसेच वनडे क्रिकेटच्या मानांकनात अग्रस्थानावरील बाबर आझमने वनडे क्रिकेट प्रकारामध्ये 5000 धावांचा टप्पा ओलांडला. क्रिकेटच्या या प्रकारात 5000 धावांचा टप्पा गाठणारा बाबर आझम हा सर्वात वेगवान फलंदाज ठरला आहे. न्यूझीलंड विरुद्ध येथे झालेल्या चौथ्या वनडे सामन्यात त्याने हा पराक्रम केला.
28 वर्षीय बाबर आझमने 99 वनडे सामन्यात 5000 धावांचा टप्पा गाठला असून त्याने दक्षिण आफ्रिकेच्या हशिम आमलाला मागे टाकले आहे. आमलाने 104 सामन्यातील 101 डावात 5000 धावा नोंदविल्या होत्या. बाबर आझमने 99 सामन्यातील 97 व्या डावात 5000 धावा पूर्ण केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या आमलाने 81 डावात 4000 धावांचा टप्पा ओलांडला होता. आमलाचा हा विक्रम बाबर आझमला मोडता आला नाही. 2015 च्या मे महिन्यात लाहोर येथे बाबर आझमने झिम्बाब्वे विरुद्ध आपले वनडे पर्दापण केले होते.









