वृत्तसंस्था/ लाहोर
आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आता 2 महिन्यांवर येऊन ठेपली असल्याने पीसीबीने पाकचा माजी कर्णधार बाबर आझमची पुन्हा पाकच्या टी-20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. पीसीबीच्या निवड समितीच्या बैठकीमध्ये बाबर आझमकडे संघाचे कर्णधारपद सोपविण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
आता बाबर आझमची पाक संघाच्या कर्णधारपदी फेरनिवड करण्यात आली आहे. यापुढे तो पाक संघाच्या वनडे आणि टी-20 संघाचा कर्णधार म्हणून राहिल. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये भारतात झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाक संघाच्या खराब कामगिरीनंतर बाबर आझमने आपल्या कप्तान पदाचा राजिनामा दिला होता. बाबर आझमने कर्णधारपद सोडल्यानंतर वेगवान गोलंदाज शाहिन अफ्रिदीची पाक टी-20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान गेल्या जानेवारीत न्यूझीलंडने पाकचा मालिकेत 4-1 असा पराभव केला होता. त्यामुळे अफ्रिदीचे कर्णधारपद धोक्यात आले होते. अमेरिका आणि विंडीज यांच्या संयुक्त यजमानपदाने आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला 1 जूनपासून प्रारंभ होत आहे.









