वृत्तसंस्था /दुबई
आयसीसीतर्फे गेल्या काही वर्षापासून पुरुष आणि महिलांच्या विभागात खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेत प्रत्येक महिन्याला सर्वोत्तम पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंची निवड केली जाते. आता 2023 च्या ऑगस्ट महिन्यासाठी आयसीसीच्या पुरुष विभागात या पुरस्कारासाठी पाकचे दोन तर विंडीजच्या एका खेळाडूचा समावेश आहे. पाकचा कर्णधार बाबर आझमने यापूर्वी आयसीसीचा हा पुरस्कार दोनवेळा मिळवला असून आता तो तिसऱ्यांदा हा पुरस्कार मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे.
पाकचा कर्णधार बाबर आझमने अलीकडच्या कालावधीत आपल्या फलंदाजीत सातत्य राखले आहे. त्याने 1 शतक आणि 2 अर्धशतके झळकवली. अफगाणविरुद्धच्या वनडे मालिकेत बाबरने शेवटच्या दोन सामन्यात दोन अर्धशतके झळकवली. तसेच त्याने दुसऱ्या वनडेत इमाम उल हकसमवेत 118 धावांची भागीदारी केली. बाबरने 53 तर इमामने 91 धावांचे योगदान दिले आहे. तिसऱ्या वनडे सामन्यात बाबरने 60 धावांची खेळी केली. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील नेपाळ विरुद्धच्या सामन्यात 151 धावांची खेळी केली होती. आशिया चषक स्पर्धेच्या इतिहासामध्ये 150 धावांचा टप्पा ओलांडणारा बाबर हा पहिला फलंदाज ठरला आहे. या पुरस्कार शर्यतीमध्ये पाकचा आणखी एक अष्टपैलू शदाब खान तसेच विंडीजचा निकोलास पुरन यांचा समावेश आहे.









