रस्त्यात सापडलेले पैशाचे पाकीट मालकास केले सुपूर्द
मालवण | प्रतिनिधी : मालवण बाजारपेठ येथील व्यापारी बबन तळवडेकर यांना रस्त्यात सापडलेले मोठी रोख रक्कम असलेले पैशाचे पाकीट तळवडेकर यांनी ओळख पटवून मालकास सुपूर्द केले आहे. मालवण व्यापारी संघांतील व्यापारी सदस्यांचा प्रामाणिकपणा पुन्हा एकदा जनतेने अनुभवला.मालवण शहर बाजारपेठ येथील व्यापारी बबन तळवडेकर यांना रस्त्यात एक पैश्याचे पाकीट सापडले. त्यात रोख रक्कम १५ हजार, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक एटीएम, क्रेडिट कार्ड होते. बबन तळावडेकर यांना पाकीट मधील आधार कार्ड वरून त्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केला. अखेर त्या व्यक्तीचा शोध लागला. त्यानंतर खात्री करण्यात आली. मुंबई येथील एक सेवानिवृत्त व्यक्ती जे आता मालवण परिसरात राहतात त्या सुनीलकुमार या व्यक्तीचे हे पाकीट असल्याची पुर्ण खात्री झाली. त्यानंतर बबन तळवडेकर यांनी मालवणचे जेष्ठ व्यापारी नानाशेठ पारकर, हेमंत शिरपुटे , जयू शिरपुटे, हर्षल बांदेकर, उमेश मयेकर, मयू पारकर यांच्या उपस्थितीत सुनील कुमार यांना पाकीट सुपूर्द करण्यात आले. सुनील कुमार यांनी बबन तळवडेकर यांचे आभार व्यक्त केले. बबन तळवडेकर यांच्या निस्वार्थी व प्रामाणिकपणा बद्दल व्यापारी वर्गाकडून तसेच नागरिकांमधून कौतुक करण्यात येत आहे.









