ऑनलाईन टीम / तरुण भारत :
महिलांच्या कपड्यांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठली होती. राज्य महिला आगोगानेही यासंदर्भात त्यांना नोटीस बजावली होती. या नोटेशीनंतर अखेर बाबा रामदेव यांनी आपल्या वक्तव्याबद्दल महिलांची माफी मागितली आहे.
बाबा रामदेव यांनी राज्य महिला आयोगाकडे लेखी स्वरूपात माफीनामा पाठवला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. बाबा रामदेव यांनी माफिनाम्यात म्हटले आहे की, “महिला आयोगाच्या नियमांनुसार मी कोणताही गुन्हा केला नाही. भारत सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओसारख्या स्त्री सक्षमीकरणाच्या अनेक योजनांना मी नेहमीच प्रोत्साहन दिलं आहे. तसंच, महिलांच्या सक्षमीकरणासाठी मी विविध सामाजिक संस्थांसोबत कामही करतो. त्यामुळे कोणत्याही महिलेचा अपमान करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. ठाण्यात आयोजित केलेला संपूर्ण कार्यक्रम महिला सशक्तीकरणवर आधारित होता. या कार्यक्रमातील काही सेकंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमधील माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे.
मी आई आणि मातृशक्तीचा नेहमीच गौरव केला आहे. माझ्या एक तासाच्या लेक्चरमध्येसुद्धा मातृशक्तीचाच गौरव करण्यात आला आहे. यामध्ये एक शब्द मी वस्त्रांसदर्भात बोललो आहे. याचा अर्थ माझ्यासारख्या साध्या वस्त्रांचा होता. मात्र, तरीही माझ्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. मी त्या सर्वांची माफी मागू इच्छितो. ज्यांचा माझ्यामुळे भावना दुखावल्या गेल्या.”
काय म्हणाले होते बाबा रामदेव?
‘साडीमध्ये महिला छान दिसतात, सलवार सूटमध्येही छान दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात’, असं आक्षेपार्ह वक्तव्य बाबा रामदेव यांनी ठाण्यातील जाहीर कार्यक्रमात केलं होतं. त्यावेळी व्यासपीठावर अमृता फडणवीस, शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. बाबा रामदेव यांच्या या विधानावरुन राज्यात वाद पेटला होता. या वक्तव्याचा दोन दिवसांत खुलासा करावा, असे महिला आयोगाने पाठविलेल्या नोटीसमध्ये म्हटले होते. त्यानुसार बाबा रामदेव यांनी माफिनामा महिला आयोगाला पाठवला आहे.