आज उघडणार दरवाजे : पाऊस-बर्फवृष्टीनंतर 30 एप्रिलपर्यंत नोंदणीला ब्रेक
वृत्तसंस्था/ देहराडून
बाबा केदारनाथची डोली सोमवारी दुपारी उत्तराखंडमधील केदारनाथ धाममध्ये पोहोचली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डोलीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. केदारनाथ धामचे दरवाजे आता मंगळवार, 25 एप्रिलला उघडतील. शनिवारी अक्षय्य तृतीयेपासून चारधाम यात्रेला सुऊवात झाली. पुढील 5 दिवसात हिंदू यात्रेकरू बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्रीला भेट देतील. 22 एप्रिल रोजी गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे उघडले. तर बद्रीनाथ धामचे दरवाजे 27 एप्रिलला उघडणार आहेत.
केदारनाथ धाममध्ये रविवारपासून पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू आहे. खराब हवामानामुळे हरिद्वार आणि ऋषिकेशमध्ये केदारनाथ यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची नोंदणी 30 एप्रिलपर्यंत थांबवण्यात आली आहे. राज्य सरकारने यात्रेकरूंसाठी एक सूचना जारी केली आहे. यात्रेकरूंना धामला जाण्यापूर्वी उबदार कपडे आणि जीवनावश्यक वस्तू सोबत ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
शनिवारी केदारनाथ धाममध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली. यात्रेकरूंनी सतर्क राहून हवामान लक्षात घेऊन प्रवासाला सुऊवात करावी. सर्व मार्गांवर उपचारासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. उत्तराखंडमधील चारधाम यात्रेदरम्यान केदारनाथ यात्रेच्या मार्गावर सरकारचे विशेष लक्ष आहे. भाविक तब्येत बिघडल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात, असे उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी जाहीर केले आहे.
मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी आणि आरोग्यमंत्री डॉ. धनसिंह रावत यांच्या सूचनेवरून आरोग्य सचिव डॉ. आर. के. राजेश कुमार चारधाम यात्रा मार्गावरील आरोग्य सेवांचा आढावा घेत आहेत. तसेच आरोग्य सचिवांनी केदारनाथ धामला भेट दिली. त्यांनी विविध ठिकाणच्या आरोग्य केंद्रांची तपासणीही केली. चारधाम यात्रेसंदर्भात आरोग्य विभागाने संपूर्ण तयारी केली आहे. 55 वर्षांवरील भाविकांना शुगर, बीपी, हृदयविकार आदी आजार असल्यास त्यांची आगाऊ माहिती द्यावी. आरोग्य सेवा 104 च्या माध्यमातून अशा भाविकांवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे आरोग्य सचिवांकडून सांगण्यात आले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी रविवारी देहराडूनमध्ये चारधाम यात्रेकरूंसाठी वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज वाहनांना हिरवा झेंडा दाखवला.









