कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी गतवर्षीपासूनच केली आहे. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच बारावीनंतर बी. ए. स्पोर्ट्ससारखा महत्वाचा चार वर्षाचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमासाठी 60 प्रवेश क्षमता असून पहिल्या वर्षाला 50 तर दुसऱ्या वर्षाला 25 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या अभ्यासक्रमातून स्वत:च्या आवडीच्या खेळाचा सराव करण्याबरोबर बीपीएडचा पायाही मजबूत केला जातोय. जीम, योगा शिक्षक, फिटनेस कन्सल्टंट, खेळाचे समालोचन (कॉमेंट्री) अशा क्रीडा क्षेत्रातील नोकरीच्या संधी प्राप्त होणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठातील क्रीडा ग्राऊंडनजीक भव्यदिव्य वसतिगृह उभारले आहे. त्यामुळे बारावी उत्तीर्ण खेळाडू विद्यार्थ्यांनी बी. ए. स्पोर्ट्स अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
स्पोट्समध्ये करिअर करण्यासाठी बीपीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. बी. ए. (पदवी) नंतर बीपीएडला प्रवेश मिळतो. पण यामध्ये आयुष्याची 20 वर्षे जातात. परंतू आता वयाच्या 17 व्या वर्षापासूनच विद्यापीठात स्पोर्ट्सचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम चार वर्षाचा असल्याने 8 सेमिस्टरमध्ये परीक्षा घेतली जाते. प्रत्येक सेमिस्टरला 22 व्रेडीट आणि 550 गुण आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बारावीनंतर बी. ए. स्पोर्ट्सला प्रवेश घेतला तर चार वर्षात अनेक करिअरच्या संधी उपलब्ध होतील.
विद्यापीठाने विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृहाचे बांधकामाची पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू आहे. खेळाडूंच्या प्रयत्नाला आता बी. ए. स्पोर्ट्सचा बुस्टर डोस मिळणार आहे. म्हणूनच स्पोर्ट्स अभ्यासक्रमाविषयी विद्यापीठ प्रशासन सातत्याने जनजगृती करीत आहे. यंदा तिसऱ्या वर्षाचा अभ्यासक्रम तयार होणार आहे. यातून विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी मिळत असल्याने विद्यार्थी संख्या वाढत आहे.
- विद्यापीठ क्रीडा प्रकार
अॅथलेटिक, बास्कटेबॉल, क्रीकेट, फुटबॉल, कुस्ती, बॅडमिंटन, टेबलटेनिस, लॉनटेनिस, हॉलीबॉल, कब्बड्डी, बुध्दीबळ, आदी खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. मॅटवरील कुस्ती संकुल साकारल्याने मॅटवरील कुस्तीचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी बी. ए. स्पोर्टस्ला प्रवेश घेतल्यानंतर आवडीच्या खेळाचा सराव करता येणार आहे. विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या खेळांचे अत्याधुनिक पध्दतीचे प्रशिक्षण दिले जातेय. त्यामुळे खेळाडूंना आपआपल्या आवडीच्या खेळात पारंगत होता येते. सराव करण्यासाठी सर्व खेळांची अद्यावत क्रीडांगण व सर्व प्रकारच्या सोयी–सुविधा उपलब्ध आहेत. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कँपला जाण्याची संधी मिळेल.
- स्पोर्टसची भाषा शिकवली जातेय
सगळ्याच खेळांमध्ये सध्या लीगचे युग आहे. या लीगमध्ये स्पोर्ट्स प्रोफेशनलची आवश्यकता असते. त्यापध्दतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जातेय. ऐवढेच नाही तर लिट्रेचर इंग्लिशच्या माध्यमातून स्पोर्ट्सची भाषा शिकवली जातेय.
- चार सेमिस्टरचा अभ्यासक्रम
सेमिस्टर 1- स्पोर्ट्स, फिजिकल एज्युकेशन, प्रॅक्टिकल ट्रॅक अॅन्ड फिल्ड, प्रॅक्टिकल्स योगा, कॉम्प्युटर अॅप्लीकेशन, प्रॅक्टिकल्स अॅडव्हेन्चर स्पोर्ट्स, इंग्लिश, सोशल मोरल एज्युकेशन, इंडियन फिलॉसॉफी ऑफ फिजिकल एज्युकेशन, कम्युनिकेशन स्किल हा अभ्यासक्रम आहे. याला 22 व्रेडिट व 550 गुण आहेत.
सेमिस्टर 2- स्पोर्ट्स, फिजिकल एज्युकेशन, बेसिक फिजिकल फिटनेस ट्रेनिंग, प्रॅक्टिकल्स ट्रॅक अॅन्ड फिल्ड, प्रॅक्टिकल्स योगा, स्पोर्ट्स जर्नालिझम आणि स्पोट्स सायकॉलॉजी, प्रॅक्टिकल्स अॅडव्हेन्चर स्पोर्ट्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, मोरल एज्युकेशन, सोशल एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. दुसऱ्या सेमिस्टरला 22 व्रेडीट व 550 गुण आहेत.
- व्दितीय वर्षाचा अभ्यासक्रम
सेमिस्टर 3- स्पोर्ट (इन्फर्मेशन टू स्पोर्ट्स बायोमेकॅनिक्स), स्पोर्ट्स एज्युकेशन (स्पोर्ट्स ट्रेनिंग), फिजिकल एज्युकेशन (हिस्ट्री ऑफ ऑलंपिक), सेल्फ डेफिनेशन ट्रेनिंग(रक्शा), अॅथलेटिक्स (टॅक अॅन्ड फिल्ड), जिम्नॅस्टिक, इंग्लिश, हिस्ट्री ऑफ फिजिकल एज्युकेशन इन इंडिया, या अभ्यासक्रमाला 22 क्रेडीट आहेत.
सेमिस्टर 4-
स्पोर्ट्स एज्युकेशन (अॅथलॅटिक्स केअर अॅन्ड रिहॅबिलिटेशन), स्पोर्ट्स एज्युकेशन (इन्ट्रोडक्शन टू स्पोर्ट ऑफिसेटींग), फिजिकल एज्युकेशन (ऑर्गनायझेशन अॅन्ड अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ मॅटस अॅन्ड टुर्नामेंटस), रिक्रेशन अॅन्ड लेसर मॅनेजमेंट, अॅथलेटिक्स (ट्रॅक अॅन्ड फिल्ड), जिम्नॅस्टिक्स, इंग्लिश, एन्व्हायर्नमेंट स्टडी या अभ्यासक्रमाला 22 क्रेडीट आहेत.
- आंतरराष्ट्रीय प्रवेश शुल्कात सवलत
बारावीनंतर कोणत्याही शाखेचा विद्यार्थी, विद्यार्थीनी प्रवेश घेवू शकतात. आंतरराष्ट्रीय खेळाडू असेल तर प्रवेशासह राहण्याच्या शुल्कात सवलत दिली जाते. राष्ट्रीय पातळीवर पारितोषिक मिळवले असेल तर 50 हजार रूपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील पारितोषिकप्राप्त खेळाडूंना 10 हजार रूपये रोख बक्षिस दिले जाते. स्पेशल प्रशिक्षणासाठी विद्यापीठाच्या स्वखर्चातून बाहेर पाठवले जाते. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा.
डॉ. शरद बनसोडे (शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक, शिवाजी विद्यापीठ)








