जैश ए मोहम्मदच्या हस्तकाने दिली जाहीर कबुली
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेल्या क्रूर आणि धर्मांध दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या ‘सिंदूर’ अभियानात कुख्यात दहशतवादी अझर मसूद याच्या संपूर्ण परिवाराचे अक्षरश: तुकडे-तुकडे झाले, अशी स्पष्ट कबुली मसूदच्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या एका प्रमुख हस्तकाने दिली आहे. त्याचे नाव मसूद इलियास काश्मीरी असे आहे. त्याने पाकिस्तानातील एका कार्यक्रमात भाषण करताना मंगळवारी ही कबुली दिली.
यामुळे भारताच्या गुप्तहेर विभागाचे यश अधिकच उठून दिसत आहे. मसूद आणि त्याचा परिवार पाकिस्तानातील बहावलपूर येथे असणाऱ्या जैश ए मोहम्मदच्या तळात वास्तव्य करुन आहे, ही अचूक माहिती गुप्तचरांनी दिली होती. त्या माहितीच्या आधारावरच भारताच्या वायुदलाने बहावलपूर येथील या तळाला लक्ष्य केले होते. अझर मसूद हा या हल्ल्यापूर्वी थोडाच वेळ आधी तेथून बाहेर पडल्याने वाचला होता. तथापि, त्याच्या कुटुंबातील 10 लोक भारले गेले.
नितीधैर्य खचले
भारताच्या या अत्यंत विघातक आणि अचूक अशा हल्ल्याने जैश ए मोहम्मद या संघटनेचे अंतर्गत नितीधैर्य खचले आहे, हेही काश्मीरी याने या कार्यक्रमात मान्य केले. यामुळे पाकिस्तानचे सरकार उघडे पडले आहे. जैश ए मोहम्मद ही संघटना दहशतवादी नाही, असा पाकिस्तान सरकारचा दावा असून त्याने तो एफएटीएफ नामक दहशतवादविरोधी आंतरराष्ट्रीय संस्थेसमोर केला आहे. तथापि, बहावलपूर येथे या संघटनेचा तळ होता, ही बाब काश्मीरी याने स्पष्ट केली आहे.
आपल्याच जनतेची फसवणूक
‘सिंदूर’ अभियानात पाकिस्ताच्या संरक्षण व्यवस्थेची, विशेषत: त्याच्या वायूदलाची अतोनात हानी झाली आहे. तथापि, आपले अपयश झाकण्यासाठी पाकिस्तानचे सेना नेतृत्व आपल्याच जनतेची आणि आंतरराष्ट्रीय समुदायाची फसवणूक करीत आहे. भारताशी झालेल्या संघर्षात आम्हीच बाजी मारला, असा धादांत खोटा दावा पाकिस्तानची सेना करीत आहे. तथापि, भारताने केलेल्या अचूक हल्ल्यात जेव्हा मसूदचे कुटुंब मारले गेले, तेव्हा जैश ए मोहम्मद ही संघटना मुळापासून हादरली आहे. तसेच या संघटनेच्या मधल्या फळीत मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली असून फूट पडली आहे, अशी माहिती काही काळापूर्वी सूत्रांनी दिली होती. ती खरी असल्याचे काश्मीरी याच्या विधानांमुळे सिद्ध झाले आहे. ‘सिंदूर’ अभियानाच्या प्रथम भागात भारताने पाकिस्तानातील महत्वाचे 9 दहशतवादी तळ उडविले होते.
कबुलीमुळे भारताची बाजू भक्कम
काश्मीरी याच्या कबुलीमुळे भारताची बाजू आंतररारष्ट्रीय समुदायात भक्कम झाली आहे. पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा आश्रयदाता आहे, हा भारताचा आरोप खरा असल्याचे आता स्पष्ट होत आहे. मुत्सद्देगिरीच्या क्षेत्रात, एफएटीएफच्या मंचावर आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठांवर भारताची विश्वासार्हता वाढली असून पाकिस्तानसंबंधीचा संशयही बळावला आहे. ‘सिंदूर’ अभियानानंतरही पाकिस्ताने दहशतवाद्यांना आश्रय देण्याचे धोरण सोडलेले नाही. आजही पाकिस्तानचा दहशतवादाला पाठिंबा असून दहशतवाद हा त्याच्या सामरिक आणि विदेश धोरणाचा महत्वाचा भाग आहे, हा भारताचा आरोपही खरा ठरत आहे.
पाकिस्तानवर दबाव वाढणार
पाकिस्तानला दहशतवादी देश म्हणून घोषित करावे, ही भारताची मागणी आहे. या मागणीला काश्मीरी याच्या विधानांमुळे बळ मिळाले आहे. परिणामी, भारत आता पाकिस्ताच्या विरोधात जोरदार आघाडी उघडण्याची योजना करत आहे. आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानला बेनकाब करण्याची संधी भारताला मिळत आहे









