वृत्तसंस्था /नवी दिल्ली
लाहोरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) संचालकपदाची जागा रिक्त झाल्याने या जागेसाठी पीसीबीने अर्ज मागविले आहेत. पाकचा माजी कसोटी आणि वनडे कर्णधार अझहर अलीने संचालकपदासाठी आपला अर्ज अकादमीकडे पाठवला आहे. क्रिकेट क्षेत्राचा अझहर अलीला चांगलाच अनुभव असल्याने कदाचित या पदासाठी पीसीबीकडून त्याला संधी मिळू शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अझहर अलीने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली होती. क्रिकेट क्षेत्राशी निगडीत राहण्याच्या हेतूने अझहर अलीने आता निवृत्तीनंतर वेगळी भूमिका निभावण्याचा निर्णय घेतला आहे. अझहर अलीने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 97 कसोटी आणि 53 वनडे सामन्यात पाकचे प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच त्याला 263 प्रथमश्रेणी सामन्यांचा अनुभव आहे. जानेवारीमध्ये पीसीबीकडून या संचालकपदासाठीच्या उमेदवाराची निवड केली जाणार आहे. सध्या राष्ट्रीय अकादमीच्या संचालकपदाची जबाबदारी माजी कसोटीवीर नदीम खान यांच्यावर तात्पुरती सोपवण्यात आली आहे.









