नागोर्नो-काराबाखवर केले पुन्हा आक्रमण
वृत्तसंस्था/ बाकू
अझरबैजानने आर्मेनियाच्या विरोधात पुन्हा एकदा युद्धाची घोषणा केली आहे. अझरबैजानच्या सैन्याने आर्मेनियाच्या भूभागात प्रवेश केला आहे. दोन्ही देशांच्या सैन्यांदरम्यान भीषण गोळीबार सुरू आहे. आक्रमणाची पूर्वकलपना रशिया आणि तुर्कियेला दिली होती असा दावा अझरबैजानने केला आहे. मागील काही महिन्यांपासून अझरबैजान अन् आर्मेनिया यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला होता. दोन्ही देशांनी परस्परांवर गोळीबार करण्याचा आरोप केला होता. दोन्ही देशांनी यापूर्वी 2020 मध्ये तीन महिन्यांपर्यंत युद्ध केले होते. या युद्धात सुमारे 7 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.
नागोर्नो-काराखाबवर पूर्ण कब्जा करणे हा अझरबैजानचा युद्धामागील उद्देश आहे. नार्गोनो काराबाखची राजधानी स्टेपानाकर्ट शहर सध्या अझरबैजानच्या सैन्याच्या तोफखान्याच्या माऱ्याला सामोरे जात आहे. या आक्रमणाची कल्पना रशियाच्या शांतता सैन्याचे कमांड अन् तुर्किये-रशिया देखरेख केंद्राला दिली होती असा दावा अझरबैजानने केला आहे.
आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात 4400 चौरस किलोमीटरमध्ये फैलावलेल्या नागोर्नो-काराबाख नावाच्या हिस्स्यावरून वाद आहे. नागोर्नो-काराबाख आंतरराष्ट्रीय स्वरुपात अझरबैजानचा हिस्सा आहे, परंतु त्यावर आर्मेनियाच्या वांशिक गटांचे नियंत्रण आहे. 1991 मध्ये या भागातील लोकांनी स्वत:ला अझरबैजानपासून स्वतंत्र घोषित करत आर्मेनियाचा हिस्सा ठरलिवे होते. त्यांची ही घोषणा अझरबैजानने फेटाळली होती. यानंतर दोन्ही देशांदरम्यान अनेकदा संघर्ष होत राहिला आहे.
सोव्हियत संघाच्या पतनानंतर आर्मेनिया आणि अझरबैजान हे देश अस्तित्वात आले होते. त्यावेळी दोन्ही देशांनी नागोर्नो-काराबाखवर स्वत:चा दावा सांगितला होता. परंतु नागोर्नो-काराबाखमधील लोकांनी आर्मेनियात सामील झाल्याची घोषणा केली होती. नागोर्नो-काराबाखमध्ये आर्मेनियन वंशाच्या लोकांचे प्रमाण अधिक आहे. हे लोक प्रामुख्याने ख्रिश्चनधर्मीय आहेत. तर अझरबैजान हा इस्लामिक देश आहे.









