पोलिसांच्या वाहनात बसण्यास दिला नकार
वृत्तसंस्था/ रामपूर
दोन जन्म प्रमाणपत्राप्रकरणी प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यावर आझम खान, अब्दुल्ला आझम यांना दुसऱ्या तुरुंगात हलविण्यात आले आहे. आझम खान यांना रविवारी सीतापूर तर अब्दुल्ला यांना हरदोई तुरुंगात हलविण्यात आले. रामपूर तुरुंगातून हलविण्यापूर्वी दोन्ही गुन्हेगारांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतर त्यांना विविध वाहनांमध्ये बसवून मोठ्या सुरक्षेसोबत सीतापूर आणि हरदोई तुरुंगात पोहोचविण्यात आले. रामपूर तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी आझम खान यांनी माझे एनकाउंटर करविले जाऊ शकते अशी भीती व्यक्त केली आहे.
पहाटे तुरुंगातून हलविण्याच्या निर्णयाचा कोणता अर्थ काढायचा? माझ्या कुटुंबाचा दीर्घकाळापासून छळ केला जात असल्याचे म्हणत आझम खान यांनी पोलिसांच्या वाहनात बसण्यास नकार दिला. आझम खान यांनी याकरता वय आणि आजारांचा दाखला दिला. यापूर्वीही आझम यांनी स्वत:च्या जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे. आझम यांचा ज्येष्ट पुत्र अदीबने शनिवारी रामपूर तुरुंगात जात आझम, आई तजीन फात्मा आणि भाऊ अब्दुल्लाची भेट घेतली होती. आझम आणि अब्दुल्ला यांना अन्य तुरुंगात हलविण्यात आले असले तरीही तजीन फात्मा या रामपूर तुरुंगातच कैद आहेत.









