राज्यात आजपासून भरगच्च कार्यक्रम : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
’आझादी का अमृत महोत्सव, हर घर तिरंगा’ अंतर्गत राज्यात आजपासून खऱया अर्थाने स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम प्रारंभ होत असून आज आग्वाद तुरुंगाच्या ठिकाणी हयात स्वातंत्र्यसैनिकांचा गौरव करण्यात येणार आहे. त्याशिवाय प्रातिनिधिक स्वरुपात चार घरांवर तिरंगा फडकविण्यात येणार आहे.
आल्तीनो येथील सरकारी निवासस्थानी काल बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. आझादी का अमृत महोत्सवचे महत्व संपूर्ण गोमंतकीयांना सांगण्याच्या उद्देशाने दि. 9 आणि 10 रोजी राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून जागृती केली होती. त्यानंतर आजपासून दि. 15 ऑगस्टपर्यंत राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
आग्वाद तुरुंगातील म्युझियमच्या ठिकाणी सायंकाळी 4 वाजता तिरंगा फडकविण्यात येईल. त्यानंतर गोव्यातील हयात स्वातंत्र्य सैनिकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येईल. त्यावेळी पर्यटन मंत्र्यांचीही उपस्थिती असेल.
पणजी, मडगावात तिरंगा यात्रा
दि. 13 रोजी सकाळी 9.30 वाजता तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. गोवा मुक्त झाल्यानंतर दि. 19 डिसेंबर 1961 रोजी जेथे सर्वप्रथम ध्वज फडकविण्यात आला त्या जुन्या सचिवालयासमोरील ध्वजस्तंभाजवळून ही तिरंगा यात्रा प्रारंभ होईल. तेथून ती आझाद मैदानापर्यंत जाईल. यात्रेपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. अशाच प्रकारे दक्षिण गोव्यातही तिरंगा यात्रा आयोजित करण्यात येईल. मडगाव येथील नगरपालिका इमारत ते लोहिया मैदानापर्यंत ही यात्रा असेल. तेथे साबांखामंत्री नीलेश काब्राल यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. दोन्ही यात्रात सर्व नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
सरकारकडून सर्वत्र तिरंगा उपलब्ध
दि. 13 ते 15 दरम्यान ’हर घर तिरंगा’ मोहिमेंतर्गत प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या घरावर तिरंगा फडकवावा. त्यादृष्टीने विविध सरकारी खाती आणि आमदार, मंत्री यांच्या माध्यमातून तिरंगा उपलब्ध करण्यात आले आहेत. असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
’फाळणी वेदना स्मरणदिन’
दि. 14 ऑगस्ट हा दिवस ’फाळणी वेदना स्मरणदिन’ म्हणून देशभरात पाळण्यात येणार असून फाळणीशी संबंधित चित्रे-पोस्टर्स आदींची प्रदर्शने आणि मूक मोर्चांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून गोव्यातही पणजी आणि म्हापसा बसस्थानक या दोन ठिकाणी प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येणार आहे.
पणजी, वास्कोत रविवारी मूकमोर्चा
याच दिवशी सायंकाळी 5.30 वाजता पणजीत चर्च चौकातून आझाद मैदानापर्यंत मूकमोर्चा मोर्चा काढण्यात येईल. त्यात स्वतः मुख्यमंत्री सहभागी होतील. याच वेळी वास्कोतही पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यपथावरून न्यूवाडे मैदानापर्यंत मूकमोर्चा काढण्यात येईल.
दि. 15 रोजी प्रत्येक तालुक्यात नियुक्त मंत्री आणि आमदार यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. तेथे विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होईल. त्यावेळी स्वातंत्र्यलढय़ात हौतात्म्य पत्करलेल्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानार्थ त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सन्मानाचे प्रमाणपत्र भेटवून गौरव करण्यात येणार आहे. त्यासाठी आतापर्यंत सुमारे 75 हुतात्म्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्यात आला आहे. यातील 47 हुतात्मे गोमंतकीय तर 28 जण अन्य राज्यांतील आहेत. 28 हुतात्म्यांच्या कुटुंबियांचा पणजीतील मुख्य कार्यक्रमातून प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात येईल. या सर्व हुतात्म्यांच्या जीवनावर आधारित विशेष पुस्तकाचेही या दिवशी प्रकाशन करण्यात येणार आहे. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त निर्मित खास गीताचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमोचन करण्यात येईल.
या प्रमुख कार्यक्रमाव्यतिरिक्त सर्व सरकारी खाती तसेच शैक्षणिक संस्थांमध्येही स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. त्यात आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धा, सोशल मीडिया आधारित ’हर घर तिरंगा’ फोटो स्पर्धा, भारतीय स्वातंत्र्य लढय़ाशी संबंधित चर्चा आणि व्याख्याने, त्याशिवाय दि. 15 रोजी राज्याच्या तिन्ही सिमांवर म्हणजेच पत्रादेवी, पॅसलरॉक आणि पोळे येथे संबंधित भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांतर्फे विशेष तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.









