दहशतवाद्यांना वित्तपुरवठा, तरुणांची माथी भडकविल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीर पोलिसांच्या राज्य तपास यंत्रणेने (एसआयए) मंगळवारी सरजन अहमद वागे उर्फ बरकती उर्फ ‘आझादी चाचा’ला अटक केली आहे. सरजन अहमद वागेवर काश्मीरमध्ये कट्टरवाद फैलावण्यासाठी क्राउडफंडिंगच्या माध्यमातून निधी जमविल्याचा आरोप आहे. सरजन अहमद वागे अर्फ बरकतीला अटक करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या एका प्रकरणात त्याचा सहभाग आढळून आला होता असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
2016 मध्ये सुरक्षा दलांकडून हिजबुल मुजाहिदीनचा पोस्टर बॉय बुरहान वानी मारला गेल्यावर आझादी चाचाने स्वत:च्या राष्ट्रविरोधी, प्रक्षोभक भाषणांच्या माध्यमातून कारवाया घडवून आणल्या होत्या. वागेने कोट्यावधी रुपये जमविले होते आणि यातील बहुतांश रक्कम स्वत:च्या कुटुंबीयांच्या नावावर खात्यांमध्ये जमा करण्यात आली होती.
दहशतवाद आणि फुरिटवादाचे समर्थन करण्यासाठी त्याने विविध स्रोतांद्वारे पैसे जमविले होते. मनी लॉन्ड्रिंग, दहशतवादाचे समर्थन करणे, फुटिरवाद फैलावणे आणि तरुणांना हिंसेच्या मार्गावर लोटण्याचा आरोप त्याच्यावर आहे. देशविरोधी घटकांच्या टोळीत त्याला ‘आझादी चाचा’ असे नाव मिळाले होते.
सरजन अहमद हा दक्षिण काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील रहिवासी आहे. जेनपोरा भागात त्याचे घर आहे. सरजन हा प्रतिबंधित जमाते-एस्लामीचा महत्त्वाचा सदस्य आहे. आझादी चाचा हा कट्टरवादी हुर्रियत कॉन्फरन्सशी देखील संबंधित होता. 2016 मध्ये दहशतवादी बुरहान मारला गेल्यावर त्याने अनेक हिंसक घटना घडवून आणल्या होत्या. शोपियां, कुलगाम आणि पुलवामाच्या विविध हिस्स्यांमध्ये त्याने देशविरोधी रॅली काढल्या होत्या. तसेच दगडफेकीच्या घटनांमध्येही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. सरजनला ऑक्टोबर 2016 मध्ये अटक करण्यात आली होती. तो सुमारे 4 वर्षांपर्यंत जनसुरक्षा अधिनियमाच्या अंतर्गत जम्मू-काश्मीरच्या तुरुंगात कैद होता.









