सात अंगणवाडी सेविकांचा ठाम निर्धार : सातही सेविकांचे उपोषण सुरुच
प्रतिनिधी / पणजी
जोपर्यंत सरकार सेवेत घेत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नसल्याचा ठाम निर्धार अंगणवाडी सेविकांनी केला आहे. येथील आझाद मैदानावर गेले 22 दिवस साखळी उपोषण करणाऱया अंगणवाडी सेविकांनी कालपासून बेमुदत उपोषण सुरु केले असल्याचे जाहीर केले आहे. आमच्या रास्त मागण्यासाठी आंदोलन केल्यामुळे केवळ सात सेविकांना सेवेतून कमी करण्यात आले हा आमच्यावर अन्याय आहे. सेवत परत घेऊन आम्हाला न्याय द्या, अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे.
काल गुरुवारी आझाद मैदानावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अंगणवाडी सेविका देवयांनी तामसे यांनी वरील माहिती दिली आहे. त्यांच्या सोबत विद्या नाईक, ज्योती केरकर व अन्य सेविका उपस्थित होत्या. सरकार विविध मार्गाने आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही महिला असूनही आझाद मैदानावर दिवस-रात्र आंदोलन करीत आहोत मात्र सरकारने आमची दखल घेतली नाही. दर दिवशी आणि रात्री आम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याचा विचार कोणीच करीत नसल्याने सर्वसामान्य जनतेचे सरकारला काहीच पडून गेलेले नसल्याचे दिसून येत आहे, असेही तामसे यांनी सांगितले.
काही दिवसापूर्वी महिला व बालकल्याण विकास खात्याच्या सचिवांनी आमची भेट घेऊन सेवेत परत घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता त्यांनी शब्द फिरविला असून आझाद मैदान न सोडल्यास कारवाई केली जाणार असल्याचे धमकी देत आहेत. सरकाला जर आमची काळजी नसेल तर आम्हाला तुरुंगात घाला मात्र न्याय मिळाल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही, असेही तामसे म्हणाल्या. आंदोलनकर्त्या अंगणवाडी सेविकांना काँग्रेस सहकार्य करीत असल्याचा आरोप केला जात आहे. वास्तविक परिस्थिती उलट असून आमचे आंदोलन हे राजकारण करण्यासाठी नसून आमच्या हक्कासाठी आहे, असेही तामसे यांनी सांगितले.
आमच्यावर अन्याय होत आहे हे स्पष्ट दिसत आहे त्याच्यासाठी आमचे आंदोलन आहे. असे असताना आता आम्ही न्याय कुणाकडे मागावा असा प्रश्न तामसे यांनी केला आहे. गेल्या 20 ते 25 वर्षे आम्ही सेविका म्हणून सेवा बजावली आहे त्याचा थोडापार फायदा आता आम्हाला मिळणार असताना त्याचवेळी आम्हाला सेवेतून कमी करून सरकार आमच्यावर अन्याय का करीत आहे. आता नव्याने सेवेत घेतल्यासही आमच्यावर अन्याय होणार आहे म्हणून आम्हाला सेवेतून कमी करण्याचा जो आदेश जारी करण्यात आला आहे तो मागे घ्या, अशी आमची मागणी असून त्यासाठी जे काय होईल त्याला सामोरे जायची आमची तयारी आहे. अखेरच्या श्वासापर्यंत आम्ही लढणार, असेही तामसे यांनी सांगितले.









