रेखा गुप्ता सरकारचा निर्णय : महिला सन्मान योजनेवर विचार सुरू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रेखा गुप्ता यांनी दिल्लीत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिल्लीत आयुष्मान भारत योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच, दिल्ली विधानसभेच्या पहिल्या सत्रात कॅगचा अहवाल सभागृहात मांडण्याचा निर्णयही घेतला आहे. तथापि, दिल्लीतील विजयानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत दिल्लीतील महिलांना भेट म्हणून ‘महिला सन्मान योजना’ सुरू केली जाईल अशी घोषणा निवडणूक प्रचाराच्या काळात करण्यात आली होती. परंतु यासंबंधीचा निर्णय तातडीने घेण्यात आला नाही. त्यावर विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.
येत्या विधानसभा अधिवेशनात नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) यांचे 14 अहवाल सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, महिला सन्मान योजना सविस्तर चर्चेनंतर लागू केली जाईल असे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान मोदींनी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत ‘महिला सन्मान योजनें’तर्गत महिलांना 2,500 रुपये मिळण्यास सुरुवात होईल असे सांगितले होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या मुद्यावर चर्चा झाली, परंतु लाभार्थ्यांच्या श्रेणीबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला नाही.
मोहल्ला क्लिनिकची चौकशी करणार
दिल्लीचे नवे आरोग्य आणि वाहतूक मंत्री डॉ. पंकज सिंह यांनी शुक्रवारी आपल्या खात्याचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर आरोग्य विभागाची अवस्था खूपच वाईट असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकची चौकशी करण्याबद्दल भाष्य केले आहे. यासोबतच, त्यांनी औषधांच्या कमतरतेपासून ते डॉक्टरांच्या प्रिक्रिप्शनची तपासणी करण्यापर्यंत सर्व गोष्टींबद्दल योग्य शहानिशा केली जाणार असल्याचेही जाहीर केले. चौकशीत काही अनियमितता आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
महिलांसाठी मोफत बसप्रवास सुरूच
दिल्लीच्या बसेसमध्ये महिलांसाठी मोफत प्रवासाची योजना सुरू ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी घेतला आहे. त्यात कोणताही बदल केला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. याचदरम्यान, वाहतूकमंत्री डॉ. पंकज सिंह यांनी डीटीसी बसेसचे संपूर्ण मूल्यांकनदेखील केले जाईल. 40 टक्के बसेस डेपोमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. तथापि, नवीन बसेस खरेदी केल्या की नाही या सर्वांची चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली आहे.
आतिशींच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना दणका
दिल्लीची सत्ता हाती घेतल्यानंतर नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता कृतीत आल्या आहेत. त्यांनी माजी मुख्यमंत्री आतिशी यांच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना सेवेतून दूर केले. माजी मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांच्या सर्व वैयक्तिक कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्यांवरून काढून टाकण्यात आले आहे. यासोबतच अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना इतर मंडळे आणि महामंडळांमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले. आठवड्याभरापूर्वी, मागील सरकारने सर्व विभागांकडून कंत्राटी आणि वैयक्तिक कर्मचाऱ्यांची माहिती मागवली होती. आता त्यांना त्यांच्या मूळ विभागात परत जाण्यास सांगण्यात आले आहे. केजरीवाल सरकारमध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये अनेक प्रकारचे अशासकीय कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.
24 पासून तीन दिवस अधिवेशन, अरविंदर सिंग लवली प्रोटेम स्पीकर
दिल्लीच्या रेखा सरकारने दिल्ली विधानसभेचे पहिले अधिवेशन बोलावले आहे. हे एक विशेष सत्र असून ते 24 फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि 27 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालेल. विधानसभेचे हे अधिवेशन 24, 25 आणि 27 फेब्रुवारी रोजी बोलावण्यात आले आहे. 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीमुळे सुट्टी असेल. या अधिवेशनकाळात अरविंदर सिंग लवली हे हंगामी सभापती (प्रोटेम स्पीकर) असतील. या अधिवेशनात सर्व नवनिर्वाचित आमदार शपथ घेतील. मिळालेल्या माहितीनुसार, या अधिवेशनात दिल्ली सरकार 5 वर्षांपासून प्रलंबित असलेले 14 कॅग अहवाल सादर करू शकते. दिल्ली विधानसभेच्या या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनावर राजकीय पक्षांव्यतिरिक्त दिल्लीतील लोकही लक्ष ठेवून आहेत. नवनिर्वाचित आमदार सभागृहात कोणते मुद्दे उपस्थित करतात आणि विरोधी पक्ष त्यावर कशी प्रतिक्रिया देतात हे पाहणे मनोरंजक असेल.









