पाच लाखांपर्यंतची शस्त्रक्रिया मोफत : लाभ घेणाऱ्यांच्या संख्येत होतेय वाढ
बेळगाव : ‘आरोग्यम् धनसंपदा’ असे म्हटले जाते. अलीकडे बदललेली जीवनशैली, व्यायामाची कमतरता, व्यसनाधीनता आदी कारणांमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. शासकीय रुग्णालयात एखाद्या आजारावर उपचार किंवा शस्त्रक्रिया उपलब्ध नसल्यास तशा रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी मोठी रक्कम मोजावी लागते. यासाठी सरकारने ‘आयुष्मान भारत-आरोग्य कर्नाटक’ (एबीआरके) योजना लागू केली आहे. या योजनेमुळे अनेक कुटुंबांना आधार मिळाला असून 1 एप्रिल 2024 ते 29 डिसेंबर 2024 पर्यंत जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 41 हजार 703 रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
रुग्णांना चांगल्या प्रकारची आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र, तसेच राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सरकारी रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक उपकरणे आणि तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली जात आहे. पण अद्यापही काही सरकारी रुग्णालयांमध्ये गंभीर स्वरुपाच्या आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध नाहीत. अशावेळी रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांवर अवलंबून रहावे लागते. यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे सर्वसामान्य गरीब जनतेला पाच लाखांपर्यंतची मोफत वैद्यकीय सुविधा ‘आयुष्मान भारत-आरोग्य कर्नाटक’ या योजनेंतर्गत उपलब्ध करून देण्यात आली आहे. 2018 पासून ही योजना जारी झाली असून अनेक जणांनी लाभ घेतला आहे. एखाद्या रुग्णाला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्या ठिकाणी उपचार उपलब्ध नसल्यास संबंधिताला शिफारसपत्र देऊन दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात येतो. ज्या रुग्णालयांमध्ये उपचार किंवा शस्त्रक्रिया केली जाते, त्या रुग्णालयाच्या बँक खात्यात सरकारकडून संबंधित आजार व शस्त्रक्रियेवर सरकारच्या ठरलेल्या पॅकेजनुसार पैसे जमा केले जातात. राज्यासह बेळगाव जिल्ह्यातील रुग्णांना या योजनेचा लाभ मिळत आहे. आपत्कालीन काळात एखाद्या वेळेस रुग्णाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यास त्या रुग्णालयातून देण्यात येणाऱ्या शिफारस पत्राला ग्राह्या धरून सरकारी रुग्णालयातून मंजुरी दिली जाते.
जिल्हा रुग्णालयाकडून आवश्यक शिफारस पत्राची सोय
बेळगाव जिल्हा रुग्णालयात सध्या सर्व प्रकारचे उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. पण केवळ कॅन्सर, मेंदू आणि हृदयरोगासंबंधी डॉक्टर उपलब्ध नसल्याने या आजाराशी संबंधित रुग्णांना अन्य रुग्णालयामध्ये उपचार घेण्याचा सल्ला देण्यात येतो. त्यासाठी जिल्हा रुग्णालयाकडून आवश्यक असलेले शिफारस पत्रही दिले जाते. त्यामुळे एबीआरके योजनेचा लाभ अनेक कुटुंबांना झाला आहे.
गतवर्षी 1 लाख 60 हजार 843 रुग्णांना लाभ
आयुष्मान भारत-आरोग्य कर्नाटक या योजनेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गतवर्षी 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत 1 लाख 60 हजार 843 रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तर 1 मार्च 2024 ते 29 डिसेंबर 2024 पर्यंत 1 लाख 41 हजार 703 रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
एपीएल रेशनकार्डधारकांनाही 30 टक्के रक्कम
देशातील इतर राज्यांमध्ये केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत या योजनेतून 5 लाखांपर्यंतच्या उपचार आणि शस्त्रक्रियेला सरकारकडून मदत केली जाते. पण कर्नाटकात राज्य सरकारच्या सहभागातून आयुष्मान भारत-आरोग्य कर्नाटक (मुख्यमंत्री आरोग्य कर्नाटक) योजना चालविली जात आहे. बीपीएल रेशनकार्डधारकांना 5 लाखांपर्यंत खर्च आल्यास तो सर्व खर्च सरकारकडून दिला जातो. एपीएल रेशनकार्डधारकांना 30 टक्के रक्कम दिली जाते. तर उर्वरित 70 टक्के रक्कम रुग्णांना भरावी लागते.
योजनेमुळे अनेक गरजू रुग्णांना मदत
सरकारच्या आयुष्मान भारत-आरोग्य कर्नाटक योजनेंतर्गत रुग्णांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून केली जाते. बीपीएल कार्डधारकांना 5 लाख रुपयांपर्यंत सर्व रक्कम सरकार अदा करते, तर एपीएल कार्डधारकांना 30 टक्के रक्कम दिली जाते. उर्वरित 70 टक्के रक्कम संबंधितांना भरावी लागते. या योजनेमुळे अनेक गरजू रुग्णांना मदत झाली आहे.
– डॉ. गीता कांबळे, जिल्हा नोडल अधिकारी (एबीआरके)









