इंग्लंड दौऱ्यासाठी वैभव सूर्यवंशीचीही निवड
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
मुंबईच्या आयुष म्हात्रेची पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या यू-19 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. या संघात 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीलाही स्थान देण्यात आले आहे. 24 जूनपासून हा दौरा सुरू होणार असूंन या दौऱ्यात 50 षटकांचा सराव सामना झाल्यानंतर पाच सामन्यांची युवा वनडे मालिका व दोन मल्टी-डे सामन्यांची मालिका इंग्लंड यू-19 संघाविरुद्ध होणार आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये प्रथमच खेळताना 14 वर्षीय सूर्यवंशी चमकदार प्रदर्शन करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने 35 चेंडूत शतक ठोकत आयपीएलमध्ये शतक ठोकणारा सर्वात युवा फलंदाज होण्याचा बहुमान मिळविल्यानंतर त्याचे सर्वच स्तरातून कौतुक झाले. आयपीएलमधील हे दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान शतक ठरले. त्याने आतापर्यंत 5 प्रथमश्रेणी आणि 6 लिस्ट ए सामने बिहारतर्फे खेळले आहेत. या प्रकारात त्याला अजून शतक नोंदवता आलेले नाही. मात्र गेल्या वर्षी चेन्नईत ऑस्ट्रेलिया यू-19 संघाविरुद्ध झालेल्या युवा कसोटीत त्याने शतक नोंदवले आहे.
भारताचा यू-19 संघ : आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मौल्यराजसिंग चावडा, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (उपकर्णधार), खिलन पटेल, हेनिल पटेल, हरवंश सिंग, आरएस अंबरिश, कनिष्क चौहान, युधजि गुहा, प्रणव राघवेंद्र, मोहम्मद इनान, आदित्य राणा, अनमोलजीत सिंग. राखीव : नमन पुष्पक, डी दीपेश, वेदांत त्रिवेदी, विकल्प तिवारी, अलंकृत रापोले.









