होंडा सरपंच आत्माराम गावकर यांचे प्रतिपादन : दीनदयाळ चिकित्सालय केंद्रातर्फे होंडा येथे मोफत वैद्यकीय शिबिर
प्रतिनिधी /वाळपई
आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण आपले आरोग्य निरोगी राखू शकतो. आयुर्वेद ही पुरातन काळापासून सुरू असलेली उपचार पद्धती आहे. या उपचार पद्धतीचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होत नसतो. त्यामुळे अशा उपचारावर प्रत्येकाने भर देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन होंडा पंचायतीचे सरपंच आत्माराम गावकर यांनी केले आहे.
दीनदयाळ चिकित्सालय केंद्र यांच्या माध्यमातून होंडा सत्तरी येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आयुर्वेदिक उपचाराने त्याचा गुण काही प्रमाणात उशिरा मिळत असतो, मात्र त्याचे आरोग्यावर कोणतेच दुष्परिणाम होत नाही. ही चांगली बाब आहे. यामुळे आयुर्वेद उपचाराचा जास्ती जास्त वापर करण्याचे आवाहन गावकर यांनी केले. यावेळी पारंपरिक दीप प्रज्वलित करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरात मोठय़ा संख्येने नागरिकांनी भाग घेतला.
यावेळी स्नेहा देसाई, दीपाजी राणे, वैद्य सृष्टी गावस, वैद्य कृपा नाईक यांची उपस्थिती होती. या शिबिरामध्ये नाडी परीक्षण, ब्लडप्रेशर, मानसिक ताण तणाव, पंचकर्म, संधिवात व इतर रोगावर उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले.









