मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन पंतप्रधानांच्या हस्ते 11 डिसेंबरला उद्घाटन
प्रतिनिधी /पणजी
केंद्रातील भाजप सरकारने गोव्याच्या विकासासाठी नेहमीच भरभरून आर्थिक मदत केली आहे. धारगळ येथेही आयुर्वेद इस्पितळ उभारत असल्याने सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज असलेले हे इस्पितळ 11 डिसेंबरपासून पूर्ण ताकदीने सुरू होणार आहे. केंद्रातील भाजप सरकारने दिलेली ही सर्वात मोठी भेट असून, या इस्पितळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी दोन वाजता होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले या इस्पितळात सध्या ओपीडी सुरू आहे. उद्घाटनानंतर या ठिकाणी पंचकर्म व इतर सर्व आयुर्वेदिक उपचार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी आयुर्वेद उपचारासाठी रुग्णांना राहण्याचीही सोय करण्यात आली असून, तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी होईल. हे इस्पितळ केवळ धारगळ व पेडणे यासाठीच मर्यादित नसून, संपूर्ण गोव्यातील जनता या इस्पितळाचा फायदा घेऊ शकेल. पत्रकार परिषदेला डॉ. राजेश भटेजा, डॉ. प्रमोद पाटकर उपस्थित होते.
दहा रुपयांत होणार नोंदणी
इस्पितळात नाव नोंदवताना केसपेपर स्वरूपात केवळ दहा रुपये नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे.
पणजीत8 डिसेंबरपासून जागतिक आयुर्वेद परिषद : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार समारोप
आतापर्यंत साडेचार हजार प्रतिनिधींची नोंदणी
राजधानी पणजीत 8 ते 11 डिसेंबर या दरम्यान जागतिक आयुर्वेद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्याच्या समारोप कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय इतर देशातील आयुर्वेद शास्त्रातील तज्ञ सहभागी होणार आहेत. मेळाव्यासाठी आतापर्यंत साडेचार हजारांची नोंदणी झाली असून, किमान 1 लाख लोक उपस्थित राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, जागतिक आयुर्वेद मेळावा हा सर्वांसाठी खुला असल्याने या ठिकाणी महाराष्ट्र व कर्नाटकातीलही लोक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे चार दिवसांत किमान 1 लाखांहून अधिक लोकांची उपस्थिती लाभेल. जागतिक आयुर्वेद मेळावा हा राज्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या मेळाव्यात चार दिवस मोफत आयुर्वेदिक उपचार करण्यात येणार आहेत. कांपाल मैदान व कला अकादमीच्या दर्शनी परिसर या मेळाव्यासाठी वापरण्यात येणार आहे. या मेळाव्यात विविध स्टॉलही उभारले जाणार आहेत.









