दरवषी 12 कोटी भाविक पोहोचतील : 32 हजार कोटींचे प्रकल्प साकारणार ; 20 पंचतारांकित हॉटेल्स सुरू होणार;
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रामनगरी अयोध्येतील मंदिराचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. एकीकडे मंदिर जीर्णोद्धार सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज होत असतानाच परिसरात हजारो कोटींचे प्रकल्पही साकारले जात आहेत. अयोध्येला जगातील सर्वात मोठे धार्मिक पर्यटन केंद्र बनवण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. या संपूर्ण प्रकल्पावर खुद्द पीएम मोदींनी लक्ष ठेवले आहे. मंगळवारी पंतप्रधानांनी अयोध्येच्या विकासाबाबत दिल्लीत बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, अयोध्येचे आयुक्त आणि जिल्हाधिकारीही उपस्थित होते. अयोध्या अधिक सुंदर आणि चांगली कशी करायची? यावर या बैठकीत विचारमंथन करण्यात आले.
मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यानंतर रामनगरीतील पर्यटक आणि भाविकांची संख्या प्रचंड वाढण्याची शक्यता गृहीत धरून अयोध्यानगरीचा विकास केला जात आहे. राम मंदिराच्या उभारणीनंतर देशातील जास्तीत जास्त भाविकांना अयोध्येत आणण्याची तयारी सरकार करत आहे. मंदिर बांधल्यानंतर येथे दर महिन्याला 1 कोटी भाविक येतील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. म्हणजेच वर्षभरात 12 कोटींहून अधिक भाविक येणार आहेत.
सरकार 320 कोटी खर्चून अयोध्येत आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधत आहे. हे विमानतळ दोन टप्प्यात बांधले जात असून धावपट्टीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. इमारत देखील 80 टक्के तयार आहे. पर्यटन विभागाच्या म्हणण्यानुसार, रामलल्ला मंदिर उद्घाटनापूर्वी विमानतळ सुरू होईल. या विमानतळावरून 15 मिनिटांत राम मंदिरापर्यंत पोहोचता येणार आहे.
अयोध्या धाम बसस्थानकाची भव्य तयारी करण्यात येत आहे. 219 कोटी ऊपये खर्चून 9 एकरांवर ते बांधले जात आहे. जे लोक आपल्या वैयक्तिक वाहनाने अयोध्येत येतील. त्यांच्यासाठी जन्मस्थळाच्या आधी एक ते दीड किमी अंतरावर वाहने पार्किंगमध्ये उभी केली जातील. यानंतर भाविक ई-रिक्षाने मंदिरात जाऊ शकणार आहेत.
अयोध्या जंक्शनच्या विकासासाठी सुरुवातीला 150 कोटींचे बजेट देण्यात आले होते, मात्र आता ते वाढवून 230 कोटी करण्यात आले आहे. नवीन स्थानक भव्य पद्धतीने उभारण्यात येत आहे. सुमारे 10 हजार चौरस मीटरमध्ये नवीन इमारत बांधण्यात येत आहे. यामध्ये 125 खोल्या, वसतिगृह, एस्केलेटर, फूड प्लाझा आणि 24 डब्यांच्या 3 प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसोबतच ही नवीन स्टेशन इमारत सुरू करण्याची सरकारची योजना आहे.
20 हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना परवाना
योगी सरकारने 20 हून अधिक हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना परवाने दिले आहेत. अयोध्येत 20 फाईव्ह-स्टार हॉटेल्स बांधली जातील. ताज हॉटेलसह अनेक बड्या समूहांचा यात समावेश आहे. ताज ग्रुपने यापूर्वीच जमिनीचा शोध घेतला आहे. ताज ग्रुप लवकरच अयोध्येत फाईव्ह स्टार हॉटेल बांधणार आहे. याशिवाय विवांता 100 खोल्या आणि जिंजर 120 खोल्या असलेले हॉटेल उघडणार आहे. तसेच रॅडिसन आणि ओयो ग्रुप लक्झरी हॉटेल्स बनवण्याच्या तयारीत आहेत. याशिवाय पर्यटकांचा थरार अनुभवण्यासाठी क्रूझही चालवण्यात येणार आहे.









