यड्राव शाळेला 50 लाखांचा निधी वितरण, डॉ. कोरेंनी स्वीकारला धनादेश
बेळगाव : ग्रामीण भागातील कन्नड शाळांच्या विकासकामासाठी अॅक्सिस बँक पुढे आली आहे. यड्राव, ता. रायबाग येथील कन्नड शाळेला सहा वर्गखोल्या बांधण्यासाठी सुमारे 50 लाखांचा निधी दिला आहे. सामाजिक सुरक्षितता निधी योजनेंतर्गत हा निधी देण्यात आला असून वर्गखोल्यांच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. अॅक्सिस बँकेचे अध्यक्ष प्रशांत श्रीनिवास यांनी केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्याकडे निधी धनादेशाच्या स्वरुपात नुकताच वितरण केला.
धनादेश स्वीकारून डॉ. कोरे म्हणाले, की केएलई संस्थेने शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात आज जागतिक स्तरावर नाव मिळविले आहे. दानशूरांच्या सहकार्यातून संस्थेची वाढ झाली असून आता कॉर्पोरेट कंपन्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत कार्य चालवले आहे. शाळांच्या इमारतींसाठी, जादा वर्गखोल्यांसाठी, शाळांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संस्थांनी पुढे यावे. या भागातील शेतकरी आणि कामगारांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी शाळांतून मूलभूत सुविधा तसेच तज्ञ शिक्षक उपलब्ध असावेत. केएलई संस्था दर्जेदार शिक्षण देण्यात अग्रेसर असून संस्थेने शिक्षण संस्थातून उपलब्ध करून दिलेल्या सुविधांमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत झाली आहे. यड्राव कन्नड शाळेला अॅक्सिस बँकेकडून मिळालेली आर्थिक मदत मोलाची आहे.
अॅक्सिस बँकेचे अध्यक्ष प्रशांत श्रीनिवास म्हणाले, ग्रामीण भागातील शाळांना वर्गखोल्या बांधण्यासाठी अनुदानाची कमतरता भासते. पण शहरातील शाळांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अधिक खर्च करण्यात येतो. शहरी भागातील शाळांना मिळणाऱ्या सुविधा ग्रामीण भागातील शाळांनाही मिळाल्यास ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगती साधणे शक्य होईल. अॅक्सिस बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष अवधूत दीक्षित, केएलई संस्थेचे सचिव डॉ. बी. जी. देसाई, केएलई संस्थेचे आर्थिक सल्लागार बसवराज जेवरगीकर उपस्थित होते. केएलईचे आजीव सदस्य महादेव बळीगार यांनी आभार मानले.









