वृत्तसंस्था/ फ्लोरिडा
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे अंतराळात जाण्याचे स्वप्न आणखीनच रखडले आहे. शुभांशू शुक्लासह इतर तिघांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस) घेऊन जाणारी अॅक्सिओम-4 मोहीम पुन्हा पुढे ढकलली आहे. ‘स्पेसएक्स’च्या फाल्कन-9 रॉकेटमधील गळती दुरुस्त करण्यासाठी अभियंत्यांनी अधिक वेळ मागितल्यामुळे उ•ाण लांबणीवर पडले आहे. ‘दुरुस्ती पूर्ण झाल्यावर आणि रेंज उपलब्ध झाल्यावर आम्ही नवीन प्रक्षेपण तारीख जाहीर करू’, अशी माहिती स्पेसएक्सने बुधवारी जारी केली आहे. पोस्ट-स्टॅटिक बूस्टर तपासणी दरम्यान आढळलेल्या द्रव ऑक्सिजन गळतीची दुरुस्ती करण्यासाठी विलंब होत असल्याने अॅक्सिओम-4 मोहिमेच्या फाल्कन-9 उ•ाणाला वेळ होत असल्याचे ‘स्पेसएक्स’ने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. यापूर्वीच्या नियोजनानुसार बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता ‘अॅक्सिओम-4’ मोहीम लाँच करण्याचे निश्चित झाले होते.









