वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली कॅपिटल्स संघाने नव्या हंगामासाठी अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. नवीन कर्णधार, नवीन प्रशिक्षक या बदलासह दिल्ली कॅपिटल्स पहिलंवहिलं जेतेपद पटकावण्यासाठी आतूर असेल. अक्षर हा दिल्लीचं नेतृत्व करणारा चौदावा खेळाडू असणार आहे.
2019 हंगामापासून अक्षर दिल्ली संघाकडून खेळतो आहे. लिलावाआधी झालेल्या रिटेन्शन प्रक्रियेत दिल्लीने 16.5 कोटी रुपये खर्चून अक्षरला रिटेन केलं होतं. त्याचवेळी अक्षर दिल्लीच्या भविष्यकालीन योजनेचा महत्त्वपूर्ण हिस्सा असेल हे स्पष्ट झालं होतं. ऋषभ पंत दिल्लीचं नेतृत्व करत होता. मात्र लिलावात लखनौ सुपरजायंट्स संघाने पंतला ताफ्यात सामील केल्याने दिल्लीची धुरा कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला होता. दिल्लीकडे फाफ डू प्लेसिस आणि केएल राहुल हे पर्याय होते. मात्र या दोघांना मागे टाकत अक्षरकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. पटेल 2019 पासून आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. 31 वर्षीय अक्षर पटेलने दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना आतापर्यंत 967 धावा केल्या आहेत आणि 62 विकेट्स घेतल्या आहेत.
दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणे माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी आमच्या मालकांचा आणि सपोर्ट स्टाफचा खूप आभारी आहे. कॅपिटल्समध्ये असताना मी एक क्रिकेटपटू आणि एक व्यक्ती म्हणून विकसित झालो आहे आणि या संघाचे नेतृत्व करण्यासाठी मी तयार आहे.
अक्षर पटेल, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार









