जगाची सैर करण्याची जवळपास प्रत्येकाची इच्छा असते. परंतु या इच्छेच्या आड पैसा अन् वेळ येत असतो. कुणाकडे जगभ्रमंतीसाठी पुरेल इतका पैसा नसतो तर ज्याच्याकडे पैसा असतो, त्याच्याकडे पुरेसा वेळ नसतो. परंतु काही जण स्वत:चे स्वप्न पूर्ण करून दाखवत असतात. अशाच लोकांपैकी एक आहे रँडी विलियम्स. जगातील सर्व 193 देशांना रँडीने भेट दिली आहे. तसेच त्याने आता स्वत:चा देश स्थापन केला आहे. कॅलिफोर्नियाच्या वाळवंटात त्याने 11.07 एकर जमीन खरेदी करत त्याला स्वत:चा देश घोषित पेले. तसेच स्वत:चा तेथील हुकुमशहा झाला आहे. कधीकाळी सॅन डिएगो येथील रेडिओ डीजे राहिलेला रँडी विलियम्सने स्वत:च्या देशाचे नाव रिपब्लिक ऑफ स्लोजमास्तान ठेवले आहे. येथे केवळ त्याचेच शासन चालते. त्याने तयार केलेले नियम अन् कायदे लोक मानतात. या देशाचा स्वत:चा पासपोर्ट, चलन आणि राष्ट्रगीत देखील आहे. रँडीने या देशाच्या चलनाला द डुबल नाव दिले आहे. अन्य देशाप्रमाणे येथील रहिवाशांसाठी नियम देखील आहेत. क्रॉक्स परिधान करणे, स्ट्रिंग पनीरला वेगळे करण्याऐवजी ते कापून खाणे आणि मम्बल रॅप संगीत वाजविण्यास येथे बंदी आहे. तसेच येथील रहिवाशांना डाव्या मार्गिकेत ड्राइव्ह करण्याची अनुमती नाही.
जगात अनेक आश्चर्यकारक ठिकाणं पाहिली आहेत, तेथे अनेक लोकांना जाण्याची संधी मिळत नाही. याचमुळे स्वत:चा देश स्थापन करण्याचा विचार मनात आला. रिपब्लिक ऑफ स्लोजमास्तानला अमेरिकेने अधिकृतपणे मान्यता दिलेली नाही, परंतु विलियम्सच्या स्लोजमास्तान पासपोर्टवर 16 देशांची मोहोर उमटली आहे. सध्या तेथे 500 लोक राहत आहेत. तर 4500 हून अधिक लोकांनी येथील नागरिकत्वासाठी अर्ज केल्याचा दावा रँडीने केला आहे. हे काही सार्वभौम राष्ट्र नाही, तसेच याला संयुक्त राष्ट्रसंघाकडून मान्यता मिळालेली नाही. प्रत्यक्षात हे मायक्रोनेशन असून जगभरात अशाप्रकारच्या देशांची संख्या 70 च्या आसपास आहे. रँडीने एप्रिल 2021 मध्ये अमेरिकेच्या नेवादामधील आणखी एक मायक्रोनेशनल रिपब्लिक ऑफ मोलोसियाला भेट दिली होती. यानंतर त्याने स्वत:चा देश स्थापन करण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबर 2021 मध्ये त्याने संबंधित जमीन 15 लाख रुपयांमध्ये खरेदी केली आणि त्यानंतर रेडिओवर याला स्वतंत्र देश घोषित केले. या कथित देशाची स्वत:ची संसद, राष्ट्रीय प्राणी अन् राष्ट्रगीत देखील आहे. याचे चलन डुबल असून ते रशियन चलन रुबलप्रमाणेच दिसते. येथे केवळ हुकुमशाही चालते, परंतु कधीकधी लोकशाहीही दिसते. आम्ही काही दिवसांसाठी लोकशाहीत असतो आणि उर्वरित दिवस आमच्याकडे सत्ता असते आणि आम्हीच निर्णय लागू करतो. मी महान नेता असून स्लोजामस्तानसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मुद्द्यांवर लोकांना बोलू देतो. आमच्याकडे 6 खंडांमधील नागरिक असल्याचा दावा रँडीने केला आहे.









