सर्वत्र कचरा : दुर्गंधी अन् चिखलाचे साम्राज्य, तळीरामांसाठी बनला अड्डा
बेळगाव : शहराचा एकीकडे कायापालट होत असताना शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या उद्यानामध्ये सर्वत्र कचरा, चिखल, अस्वच्छता, फुटलेले फूटपाथ अशी स्थिती दिसून येत आहे. गोगटे सर्कल येथील उद्यान विकासापासून दूर आहे. परंतु याठिकाणी काही बेघरांनी ठाण मांडले असून त्यांच्याकडून अस्वच्छता केली जात आहे. गोगटे सर्कल येथील उद्यानाचा हा परिसर कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत येतो. मध्यंतरी कॅन्टोन्मेंट बोर्डने महापालिकेच्या सहकार्यातून उद्यानाचा विकास करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु बेंगळूर येथील संरक्षण मंत्रालयाच्या डीईओ कार्यालयाने परवानगी नाकारली. त्यामुळे या उद्यानाचा विकास झाला नाही. शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणी उद्यान असल्यामुळे फिरते विक्रेते, बेघर याठिकाणी आसरा घेतात. परंतु त्यांच्याकडून उद्यानाची नासधूस करण्यात येत आहे.
उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. या कचऱ्याची दुर्गंधी रेल्वे स्थानकापर्यंत येत असते. उद्यानामध्ये आग पेटवून झाडे जाळण्याचा प्रकार अनेकवेळा झाला आहे. फाटके कपडे अनेक ठिकाणी बांधण्यात आले आहेत. तसेच मलमूत्र विसर्जन याच परिसरात केले जात असल्याने दुर्गंधी पसरली आहे. शहरात मोक्याच्या ठिकाणी उद्यान असतानाही त्याचा विकास होत नसल्याने गैरसोयी वाढल्या आहेत. रात्रीच्या वेळी तळीरामांसाठी हा दारूचा अड्डा बनला आहे. उद्यानाचा विकास केल्यास रेल्वेतून आलेल्या प्रवाशांना काहीकाळ विश्रांती घेण्याचे ठिकाण ठरेल. अन्यथा कॅन्टोन्मेंटने हे उद्यान गेट घालून कायमस्वरुपी बंद करावे. यामुळे बेघर अथवा इतर नागरिक आतमध्ये प्रवेश करणार नाहीत आणि त्यांच्यामुळे दुर्गंधीही पसरणार नाही, याची खबरदारी कॅन्टोन्मेंट प्रशासनाने घ्यावी.
परिसरात काही बेघर रस्त्यावर ठाण मांडून 
सध्या कोरोनाचे संक्रमण सुरू असल्याने सर्वत्र आरोग्याची काळजी घेतली जात आहे. परंतु गोगटे सर्कल येथील उद्यान तसेच रेल्वे स्टेशन रोडवर परिसरात काही बेघर रस्त्यावर ठाण मांडून आहेत. त्यांच्याकडून अस्वच्छता पसरविली जात आहे. यातील काहीजण पावसाळी छत्री, पेन, चारचाकी वाहनांचे वायफर, फुगे यासह इतर साहित्य सिग्नलवर विक्री करत आहेत. त्यामुळे एखाद्या जरी व्यक्तीला कोरोना झाला तर त्याचे संक्रमण किती जणांपर्यंत पोहोचेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.









