बेळगाव सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय
बेळगाव : राज्यात लवकरच जात जनगणना केली जाणार आहे. त्यामुळे मराठा समाजाने जात नोंदणी करताना धर्म हिंदू, जात मराठा, पोटजात कुणबी, मातृभाषा मराठी अशी नोंद करावी, असे आवाहन बेळगाव सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी जत्तीमठात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्रकाश मरगाळे होते. कर्नाटक सरकारकडून राज्यात जात जनगणना केली जाणार आहे. यामुळे गणतीवेळी मराठा समाजाने व्यवस्थितरित्या माहिती देणे गरजेचे आहे. धर्म हिंदू, जात मराठा, पोटजात कुणबी व मातृभाषा मराठी असे सांगण्यात यावे. कारण यामुळे कर्नाटकात मराठा समाज किती आहे, हे समजणे सोपे होणार आहे. याबाबत समाजात जागृती व्हावी यासाठी लवकरच पत्रके काढून जागृती केली जाणार आहे. तसेच घरोघरी जाऊन मराठा समाजात जनजागृती करण्याचा निर्णयही घेण्यात आला. यावेळी मराठा समाजाचे नेते किरण जाधव, रमाकांत कोंडुसकर, शिवराज पाटील, गुणवंत पाटील, रवींद्र जाधव, रणजीत चव्हाण-पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.









