महापालिकेच्यावतीने मतदार ओळखपत्राला आधार लिंक करण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्याचा आदेश निवडणूक आयोगाने बजावला आहे. त्याकरिता जागृती मोहीम राबविण्यात येत आहे. महापालिकेच्यावतीने शुक्रवारी शहापूर परिसरात जागृती फेरी काढून आधार लिंक करण्याचे आवाहन मतदारांना केले. महापालिका आयुक्तांच्या नेतृत्वाखाली ही फेरी काढण्यात आली.
प्रत्येक मतदाराचा आधार क्रमांक जोडणे बंधनकारक आहे. याकरिता 46 दिवसात सर्व आधार क्रमांक जोडण्याची सूचना निवडणूक आयोगाने केली आहे. त्यामुळे मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी शुक्रवारी गोवावेस येथील मनपाच्या विभागीय कार्यालयापासून फेरी काढण्यात आली. प्रत्येक मतदाराने आपले आधार ओळखपत्र बीएलओकडे सादर करावे किंवा महापालिकेच्या निवडणूक विभागात आधार क्रमांक द्यावा, असे
आवाहन जागृती फेरीवेळी करण्यात आले.
गोवावेस येथील महसूल विभाग कार्यालयापासून या फेरीस सुरुवात करण्यात आली. कोरे गल्ली, दाणे गल्ली, खडेबाजार शहापूर आणि अळवाण गल्ली अशा मार्गे महापालिका कार्यालयात जागृती फेरीची सांगता करण्यात आली. तसेच भाग्यनगर परिसरात देखील जागृती फेरी काढण्यात आली.
यावेळी महापालिका आयुक्त रूदेश घाळी, सामान्य प्रशासन उपायुक्त भाग्यश्री हुग्गी, महसूल उपायुक्त प्रशांत हणगंडी, सहाय्यक कौन्सिल सेपेटरी एफ. बी. पीरजादे, महसूल निरीक्षक एल. एस. बच्चलपुरी आदींसह बीएलओ आणि महापालिकेचे कर्मचारी जागृती फेरीमध्ये सहभागी झाले होते.









