दक्षता घेण्याचे नागरिकांना आवाहन : ‘स्वच्छतेकडून समृद्धीकडे’चा संदेश
वार्ताहर /काकती
कोरोना इतकाच भयानक डेंग्यू हा रोग असून हा रोगप्रतिकार शक्तीवर आघात करतो. त्यामुळे पांढऱया पेशींचा समतोल राखणे कठीण होते. डेंग्यू आजाराबद्दल अधिकाधिक जनजागृती व्हावी म्हणून हा दिवस पाळला जातो, असे प्रतिपादन ग्रा. पं. उपाध्यक्षा वर्षा मुचंडीकर यांनी केले.
सरकारी शाळांच्या पटांगणात, प्राथमिक आरोग्य केंद्र न्यू वंटमुरी आणि राणी चन्नम्मा विश्वविद्यालय एमएसडब्ल्यू यांच्या संयुक्त विद्यमाने 16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे आचरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी मराठी शाळेचे मुख्याध्यापक किरण करंबळकर होते. आरोग्य निरीक्षक रवि गुरुवण्णवर यांनी स्वागत केले.
डेंग्यूच्या डासाने चावल्यानंतर 3 ते 5 दिवसांत ताप येण्यास सुरुवात होते. या आजाराचे दोन प्रकार असून डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ) हा अधिक तीव्र आहे, असे न्यू वंटमुरी प्राथमिक आरोग्य केंद्रप्रमुख डॉ. अभिनंदन वाली यांनी सांगितले.
ग्रा. पं. उपाध्यक्षा वर्षा मुचंडीकर यांच्या हस्ते डेंग्यू जागृती फेरीचे उद्घाटन करण्यात आले. सरकारी शाळेतील मराठी, कन्नड, उर्दू शाळांचे विद्यार्थी, शिक्षकवृंद, अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या आदींनी फेरीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्वच्छतेकडून समृद्धीकडे हा संदेश दिला. साचलेले पाणी डासांचे माहेर, पळवा पळवा डेंग्यूला पळवा… अशा घोषवाक्मयांनी गल्लोगल्ली जागृती करण्यात आली.









