सक्तीचे कानडीकरण थांबविण्यासाठी खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे जागृती फेरी
खानापूर : कर्नाटक सरकारने बेळगावसह संपूर्ण सीमाभागात सक्तीने कन्नडसक्ती लागू करण्याचे धोरण अवलंबले आहे. यामुळे मराठी भाषिकांचे घटनात्मक अधिकार हिरावून घेतले जात आहेत. भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार मराठी भाषिकांना कानडीबरोबर मराठीमधूनही सरकारी परिपत्रके उपलब्ध करून द्यावीत, तसेच सक्तीचे कानडीकरण थांबवावे, या मागणीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवार दि. 11 ऑगस्ट रोजी मराठी भाषिकांचा बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चाला खानापूर समितीने पाठिंबा जाहीर केला आहे. तालुक्यातून मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित रहावेत, यासाठी तालुक्यात जागृती फेरी काढण्यात येत आहे. नंदगड येथे बुधवारी जागृती फेरी काढून पत्रके वाटण्यात आली.
ज्या प्रदेशात 15 टक्केपेक्षा जास्त संख्या असलेल्या भाषिक अल्पसंख्याकांना त्यांच्या मातृभाषेतून सरकारी परिपत्रके उपलब्ध करून देण्याचा कायदा असला तरी कर्नाटक सरकार सीमाभागात सक्तीने कन्नडसक्ती राबवित असल्यामुळे मराठी भाषा व संस्कृतीवर अन्याय होत आहे. त्यामुळे ही कन्नडसक्ती त्वरित थांबवून, मराठी भाषिकांना त्यांच्या मातृभाषेतून व्यवहार करता यावा यासाठी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हा, असे आवाहन म. ए. समिती पदाधिकाऱ्यांतर्फे नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन करण्यात आले. या जागृती फेरीमध्ये खानापूर तालुका म. ए. समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई, आबासाहेब दळवी, म. ए. समितीचे नेते राजाराम देसाई, मोहन गुरव, सुधीर पाटील, अशोक पाटील, नारायण पाटील, शंकर यळळूरकर, विनायक चव्हाण, पुंडलिक गुरव, चंद्रकांत देसाई यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.









